'15-20 दिवसांत शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा मोठा दावा

Maharashtra Politics : अजित पवार हे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पाहून सोबत आले तसेच शरद पवार हे सुद्धा मोदी यांच्यासोबत येतील. देशहितासाठी ते पुढे येतील आणि हा चमत्कार नक्कीच होईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 29, 2023, 01:24 PM IST
'15-20 दिवसांत शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा मोठा दावा title=
(फोटो सौजन्य - PTI)

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : येत्या 15-20 दिवसांत चमत्कार घडेल, तसेच राज्यात अन केंद्रात शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहभाग असणारे मजबूत सरकार दिसेल असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. येत्या काही  दिवसांत राज्यात चमत्कार घडणार असल्याचे राणा यांनी म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतील आमदार मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठी खळबळ माजली आहे.

"लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर राज्याच्या आणि केंद्राच्या हितासाठी प्रार्थना केली. अजित पवार ज्या पद्धतीने सरकारमध्ये सामील झाले त्याचप्रमाणे लालबागच्या राजाला साकडं घातलं की शरद पवार हे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते राज्याच्या आणि केंद्राच्या विकासामध्ये साथ देतील. येणाऱ्या 15 ते 20 दिवसांत नक्की चमत्कार होईल आणि शरद पवार मोदींना पाठिंबा देतील. राज्यात आणि केंद्रात मोदी सरकार मजबूत होऊन विकास होईल,"

"ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री झाले.  एकनाथ शिंदे मंत्री होते आता मुख्यमंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्षनेते होते आता उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार हे सुद्धा 15 ते 20 दिवसांत पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. राजकारणामध्ये काहीपण शक्य आहे. काहीही अशक्य नाही," असे रवी राणा यांनी म्हटलं आहे.