आमदार नितीन देशमुख हरवल्याची पत्नीची तक्रार, शोधासाठी पोलीस पथक रवाना

आमदार नितीन देशमुख काल रात्रीपासून नॉट रिचेबल

Updated: Jun 21, 2022, 09:16 PM IST
आमदार नितीन देशमुख हरवल्याची पत्नीची तक्रार, शोधासाठी पोलीस पथक रवाना title=

जयेश जगड, झी मीडिया अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी यासंदर्भात नितीन देशमुख यांची मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार सिव्हील लाईन्स पोलिसांना जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आमदार नितीन देशमुख हे गुजरातमधल्या सुरत इथं असल्याची माहिती मिळाली आहे. नितीन देशमुख यांच्या शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांचा एक पथक सुरातसाठी रवाना झालंय. यामध्ये एक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक आता अकोल्यातून रवाना झालं असून उद्या सुरतमध्ये पोहचणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास 35 समर्थक आमदार सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. यामध्ये सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या राजकीय भूमिकेमुळे पक्षातील निष्ठावान पदाधिकारी संभ्रमात पडले असून जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सुरत इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.