कुलगुरुंसह कर्मचाऱ्यांना 'मिरजकर सराफ'चा गंडा

आजी माजी कुलगुरूंसह कर्मचाऱ्यांचीही यात कोट्यवधींची फसवणूक झालीय

Updated: Aug 4, 2018, 04:02 PM IST
कुलगुरुंसह कर्मचाऱ्यांना 'मिरजकर सराफ'चा गंडा  title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये इमू, केबीसी, मैत्रेय, चिटफंड अशा फसवणुकींनंतर आता कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणारं 'मिरजकर सराफ' प्रकरण पुढे आलंय. यात मिरजकर सराफची योजना चक्क यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पदाधिकाऱ्यांनी राबवल्याचं उघड झालंय. आजी माजी कुलगुरूंसह कर्मचाऱ्यांचीही यात कोट्यवधींची फसवणूक झालीय. 

नाशिकमध्ये सध्या मिरजकर ज्वेलर्स प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. आतापर्यंत २०० तक्राऱदार समोर आलेत. फसवणुकीचा आकडा ४० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायूनंदन यांची आणि विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचीही फसवणूक झालीय. विशेष म्हणजे विद्यापीठातल्याच काही लोकांना हाताशी धरून कुलगुरूंच्या नावानेच ही सुवर्ण गुंतवणूक योजना सुरू करण्यात आली. मात्र आता मिरजकर ज्वेलर्सचे सर्व ११ संचालक कोट्यवधींची फसवणूक करून फरार झाल्याने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांचे कर्मचारी आणि शेकडो गुंतवणूकदार यांचे पैसे अडकलेत. 

सर्व ११ संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर आशुतोष चंद्रात्रे या संचालकाला अटक कऱण्यात आलीय. २०० तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. रोज तक्रारदारांची संख्या वाढतेच आहे. मात्र जास्त व्याजाच्या आमीषापासून स्वतः विद्यापीठाचे कुलगुरूही स्वतःला दूर ठेऊ शकत नसतील तर खरोखर गंभीरच आहे.