विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड: परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही आणि त्यांनी रस्त्यासोबत सेल्फी काढला. धनंजय मुंडे यांचा हा 'सेल्फी विथ रोड' सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतोय. या सेल्फीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
परळी शहरवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी काम अत्यंत वेगाने, दर्जात्मक पद्धतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही! आणि गाडीतून उतरून सेल्फी घेतला.
दोन टप्प्यात काम सुरु
परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जातो. पहिल्या टप्प्यात कन्हेरवाडी ते टोकवाडी या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी 54 कोटी रुपये निधी खर्च अपेक्षित आहे. मे. यश कन्स्ट्रक्शन या कंपनी मार्फत या रस्त्याचे काम सुरू असून, रेल्वे ओव्हर ब्रिज वगळता सुमारे 80% काम पूर्णत्वाकडे आले आहे.
मागील वर्षी 3 जुलै रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात टोकवाडी ते संगम या रस्त्याचे सुमारे पावणे तीन किलोमीटरचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तर धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहर बायपासचा एक टप्पा आता पूर्णत्वाकडे आला असून, यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक व दळणवळण सुविधेत आमूलाग्र सकारात्मक परिणाम होणार आहे.
मागील सरकारच्या काळात सुमारे 4 वेळा वेगवेगळ्या मंत्री महोदयांना परळीत बोलावून 4 भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करून सुद्धा तत्कालीन पालकमंत्र्यांना बायपासचे काम सुरू देखील करता आले नव्हते असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता त्यामुळेच की काय, या कामाचे पूर्णत्वाकडे जात असलेले रूप पाहून धनंजय मुंडे यांना रस्त्यावर सेल्फी घ्यायचा मोह आवरला नसावा!
पंकजा मुंडेचा सेल्फी
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सुद्धा सेल्फी व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांनीही मंत्री असताना जलयुक्त शिवारचे काम केल्यानंतर अचानक लातूरला एका जिल्ह्यात शिवाराच्या कामाला भेट दिल्यानंतर सेल्फी काढला होता. तो प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर टीका झाली होती. पंकजा मुंडेच्या या सेल्फीला प्रत्युत्तर म्हणून आता धनंजय मुंडे यांनी कामाच्या पोचपावतीचा सेल्फी काढलाय. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी सेल्फीतून पंकजा मुंडेना डिवचण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान धनंजय मुंडे यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नसला हे जरी खरं असलं तरी जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था आहे. त्यामुळे नागरिक नक्कीच दुरावस्था असलेल्या रस्त्यांचे सेल्फी काढून धनंजय मुंडे यांना पाठवतील इतकं मात्र नक्की.