माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : हिवाळा सुरु झालाय. त्यामुळं राज्यातल्या जलाशयांवर परदेशी पाहुण्यांची गर्दी झालीय. हे पक्षी पाहण्याची पर्वणी पक्षीनिरीक्षकांनी मिळतेय. या पक्षांच्या येण्याने वातावरणात एक वेगळंच चैतन्य आलं आहे. गुलाबी थंडी आणि हे परदेशी पाहुणे हे मन अगदी प्रसन्न करतात.
हे रंगबेरंगी पक्षी... या पक्षांची ही जत्रा भरलीय भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तलावावर... भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जलाशयांवर सध्या परदेशी पाहुणे पाहुणचार घेतायत. रंगबेरंगी पक्षांनी जलायशाचा परिसर बहरुन गेलाय. या पक्षांच्या किलबिलाटानं परिसर गजबजून गेलाय. हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे पक्षी दरवर्षी या तलावांवर येतात. यंदा पक्षांसाठी स्थिती अनुकूल असल्यानं पक्षांची संख्या वाढल्याचं पक्षीप्रेमी सांगतात.
'उत्तरेकडे बर्फ पडल्याने हे पक्षी अन्नाच्या शोधात इथे आले आहेत. हे मोठे बदक एवढा प्रवास करत असतात. दरवर्षी यांचे इथे वास्तव्य असते', असं पक्षीनिरीक्षक, पंकज देशमुख सांगतात. ग्रेलेक गूज, नॉर्दर्न पिंटेल, नॉर्दर्न शॉवेलर, युरेशियन विजन असे कितीतरी जातीचे पक्षी या तलावांवर आलेत. स्थानिक शिकाऱ्यांकडून या पक्षांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळं पक्षी निरीक्षणावेळी पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारीही पक्षीनिरीक्षकांनी अंगावर घेतलीय.
पक्षांची ही जत्रा उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत चालणार आहे. दरम्यानच्या काळात या जलाशयांवर येणाऱ्या पाहुण्यांची संख्याही वाढेल. पक्षांची ही जत्रा डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरलीय. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटनप्रेमींची देखील संख्या वाढली आहे.