योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : अवकाळी पावसामुळे आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यांमध्ये द्राक्षबागांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे निर्यातीवरही विपरीत परिणाम होणार आहे. तसंच द्राक्षांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसतोय. फुलोऱ्यातील बागांचे घड कुजले आहेत तर शंभर टक्के द्राक्षांच्या मण्यांना तडे गेलेत. त्यामुळे निर्यातीला आवश्यक असलेला दर्जा द्राक्षांमध्ये दिसून येत नाही जेणेकरून काढणीला आलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान होत आहे.
द्राक्षांची सर्वाधिक निर्यात करणारा अव्वल जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. गेल्यावर्षी नाशिकमधून ३८००० निर्यातक्षम बागांमधून शेतकऱ्यांनी एक लाख ११ हजार ६८४ टन निर्यात क्षम द्राक्ष पिकवली होती. मात्र यावर्षी तीस टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे .याआधी ५ हजार ५४ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. मात्र यंदा रशिया दुबई, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये फक्त ८६० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली.
तसंच ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचा गोडवा वाढण्याऐवजी आंबट द्राक्ष होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी, बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र उत्पादनावरच परिणाम होत असल्यामुळे द्राक्षांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.