मुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्या

Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2024, 07:46 AM IST
मुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्या title=
Mhada Konkan Board Lottery declared for 12 thousand homes in thane palghar

Mhada Lottery 2024: अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहिर झाली आहे. मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता हक्काचे घर मिळाले आहे. मुंबईनंतर आता कोकण मंडळानेही लॉटरी काढली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी आज शुक्रवारी 12 वाजता सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो-लाइव्ह कार्यक्रमातर्गंत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या सोडतीत ठाणे शहर व जिल्हाा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गंत 512 सदानिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गंत एकूण 661 सदनिका आहेत. तसंच, मंडळाच्या विखुरलेल्या 131 सदनिकांचाही समावेश आहे. 

दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, प्रथम प्राधान्य योजनेंतर्गंत या घरांची विक्री करण्यात येणार आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृती आणि ताबा प्रक्रिया सुरू राहणार. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. 

अर्ज कुठं करायचा?

अर्जदारांना म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी https://lottery.mhada.gov.in आणि कोकण म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहेत.