Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: ठाण्यातील मुंब्रा येथे फळविक्रेत्यांकडून मराठी भाषेवरुन एका तरुणाला धमकावण्यात आल्याचा प्रकार तापलेला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. ठराविक भाषा बोलण्यासाठी जबरदस्ती करणं योग्य नसल्याचं मत मांडताना या प्रकरणाला जातीय रंग न देण्याचं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.
मुंब्रा येथे मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आल्याचं गुरुवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच मराठी भाषेत बोल असं सांगितल्याबद्दल माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. घडलेला संपूर्ण घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.
व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो. तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते? अशी उलट विचारणा तो करतो. महाराष्ट्रात राहून त्याला 10 वर्षं झाली तरी मराठी येत नाही असं तरुण सांगत असताना, तो त्याला महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार? अशी उलट विचारणा केली गेली. यादरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.
नक्की वाचा >> '...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!
आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना मुंब्रा येथील व्हायरल व्हिडीओवरुन प्रश्न विचारण्यात आला. काही फळवाल्यांना हिंदीऐवजी मराठीत बोलण्यास सांगण्यावरुन काही स्थानिकांनी मराठी तरुणाला धमकावलं. तसेच नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरुन वाद सुरु झाला आहे. असं असतानाच स्थानिक आमदार म्हणून आव्हाड यांना पत्रकार परिषदेत यावरुन प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना, "हा वाद लहान मुलांमध्ये झालेला वाद आहे. त्याला भाषिक, जातीय रंग देऊ नका," असं आव्हाड यांनी मुंब्र्यामधील मराठी-हिंदी वादाबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
"पोलिसांना सांगितले आहे दोघांना बोलावून घ्या," असंही आव्हाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "जे घडलं ते चुकीचं आहे," अशी पुष्टीही शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या आव्हाडांनी जोडली.
Mumbra | Marathi Vs Hindi | मुंब्र्यात मराठी-हिंदी भाषिक वाद, मराठी तरुणावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल#zee24taas #mumbai #mumbra #marathi #hindi https://t.co/HMctsx5Aoo pic.twitter.com/dkg3387ZGD
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 2, 2025
मात्र त्याचवेळी आव्हाड यांनी कोणी कोणावरही ठराविक भाषा बोलण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही असं विधान केलं. "तुम्ही कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. मराठी बोलायला लावणं हे देखील चुकीचं आणि हिंदी बोलायला लावणं हेही चुकीचं आहे," असंही आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी शेवटी, "त्याच्या हातात जे दिलेले ते त्यांनी पार पाडलं. यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा मी कोणाशीही बोलणार नाही," असं आव्हाड यांनी म्हटलं.