'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!

Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 3, 2025, 03:46 PM IST
'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी! title=
मनसेचा हल्लाबोल

Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: मुंब्रा येथील मराठी आणि हिंदी भाषिक वादानंतर या वादामध्ये मराठीसाठी भांडणाऱ्या विशाल गवळी या तरुणाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांची भेट घेतली. आपल्याला भीती वाटत असल्याचं या विशालने सांगितलं. तसेच "माझ्या जीवाला धोका आहे. माझे परिवार भयभीत झाले असून मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचे तरुणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अविनाश जाधव यांनी या प्रकरणावरुन थेट घरात घुसून मारण्याचा इशारा दिला आहे.

कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पहावे

मुंब्र्यात जर कोणी आरे केले तर यापुढे आम्ही त्याला कारे करू, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. "मराठी भाषेसंदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पहावे," असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच अविनाश जाधव यांनी मागील काही दिवसांमध्ये मराठीसंदर्भात अरे प्रकार वाढल्याचं दिसत असून अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ही स्थिती असेल त्या दर्जाला काय अर्थ आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. 

कायदा केला पाहिजे की...

"मागील काही दिवसांमध्ये राज्यभरात खास करुन ठाणे जिल्ह्यात अशा घटना खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही चौथी घटना आहे. आधी कल्याणमध्ये झालं. मग ठाण्यात झाली, मग नालासोपाऱ्यात झाली आता ही घटना झाली. जर एखाद्या मुलाला महाराष्ट्रात मराठी बोल सांगितल्यावर माफी मागावी लागत असली तर हे आमचं दुर्भाग्य आहे," अशा शब्दांमध्ये अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. "तुम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपयोग काय? आमच्या महाराष्ट्रात मराठीचा सन्मान होत नसेल तर अभिषात भाषेचा दर्जा घेऊन करायचं काय आम्ही? तुम्ही अभिजात भाषेच्या दर्जाबरोबर कायदा पण केला पाहिजे. जर मराठीबाबतीत चुकीची वक्तव्य केली तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल असा कायदा केला पाहिजे," असं अविनाश जाधव म्हणाले. 

नक्की वाचा >> 'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया

...तर आम्ही एका बापाची औलाद नाही

तसेच महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याची हिंमत येते कुठून असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला. "एवढी हिंमत येते कुठून? परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या मुलाला धमकी देणार असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाली पाहिजे. मनसे आता त्याच्या पाठीशी खंबीरपणे आहे. कोणामध्ये हिंमत आहे त्यांनी याला काही करुन दाखवावं. नाही आम्ही यांना घरात घुसून घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे दाखवलं नाही तर आम्ही एका बापाची औलाद नाही," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

नेमका वाद काय?

मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही?  असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो. तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते? अशी उलट विचारणा तो करतो. महाराष्ट्रात राहून त्याला 10 वर्षं झाली तरी मराठी येत नाही असं तरुण सांगत असताना, तो त्याल महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार? अशी उलट विचारणा केली जाते. तसंच 100 नंबरला फोन करुन जमा करा असंही म्हटलं जातं. यादरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.