विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : तुमचं नाव जर 'मनोज' असेल तर एका हॉटेलमध्ये तुम्हाला मोफत जेवण मिळणार आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी मनोज नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून 23 ऑक्टोबरपासून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. त्यासाठी त्यांना मराठा बांधवांकडून मोठे सहकार्य मिळत आहे. आपल्याकडूनही त्यांना समर्थन मिळावं असा विचार मनात घेऊन बाळासाहेब भोजने यांनी जरांगे यांचे नाव 'मनोज' असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट बाळासाहेब भोजने यांनी ठेवली आहे.
"मनोज जरांगे पाटील यांची काम करण्याची पद्धत मला आवडली. थोड्याच दिवसांत त्यांनी मराठा समाजाला एकत्र केलं. त्यांचे काम मला आवडल्यामुळे मनोज नाव असणाऱ्यांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. या अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळसी उद्धव नाव असणाऱ्यांना मोफत जेवण देण्यात आलं होतं. महिन्याभरासाठी हा उप्रकम राबवण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे काम मला आवडलं. त्यांच्याविषयी आदर म्हणून हा उपक्रम राबवला आहे. आतापर्यंत 150 ते 200 लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. आधी 23 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर असा कालावधी ठेवला होता. पण आता या स्किमची तारीख वाढवणार आहे. मनोज नावाच्या व्यक्तीसाठी आम्ही स्पेशल थाळी तयार केली आहे. त्यांच्यासाठी स्पेशल मेन्यू तयार करण्यात आला आहे," असे हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी सांगितले.
"प्रत्येक समाजाला असा योद्धा भेटायला पाहिजे. जरांगेंचा आरक्षणचा लढा बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. त्यावेळी काही मंत्र्यांनी त्यांना बाजूला जाऊन बोलू असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी जे काही आहे ते इथे बोला असे सांगितले. म्हणजे त्या माणसाच्या मनात कुटुंब आधी नाही मराठा समाज अगोदर आहे. दुसरा माणूस असता तर मॅनेज झाला असता. त्यामुळे त्यांचा हा निर्णय मला खूप आवडला. त्यांनी आधी समाज बघितला आणि मग कुटुंबाला प्राधान्य दिलं," असेही भोजने म्हणाले.