निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Updated: Jun 9, 2020, 09:02 AM IST
निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल title=
संग्रहित छाया

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. याचा फटका महावितरण कंपनीला बसला आहे. अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोसळल्याने कोकणमधील अनेक गावे आजही अंधारात आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने आता राज्य शासनाने चक्रीवादळग्रस्तांना मोफत रॉकेल (केरोसीन) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंधारात चाचपडाणाऱ्यांना मोठा दिसाला मिळणार आहे.

 निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगड वासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, दापोली, मंडणगड, राजापूर आदी ठिकाणीही विद्युपत पुवठा खंडीत आहे. त्यांना मोफत रॉकेल मिळणार नाही का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. भुजबळ यांनी केवळ रायगड जिल्ह्याचा उल्लेख केल्याने रत्नागिरीतूनही मोफत रॉकेल देण्याची मागणी केली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतुक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणाच्या विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याबाबत महावितरणला त्वरित आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे. केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाने  नैसर्गिक आपत्ती, मत्स्य व्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा आणि मेळावे आदी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे रॉकेल राज्यास उपलब्ध करुन दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५  शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका पाच लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे रॉकेल नियतन मंजूर करण्यात आले आहे.