Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका लक्षणीयरित्या वाढला. धुळ्यात तर, तापमानानं 4 अंशांचा निच्चांकी आडका दाखवून दिला आणि याच विक्रमी थंडीमुळं प्रशासनानंही काही महत्त्वाची पावलं उचलली. आता मात्र हीच थंडी काहीशी माघार घेताना दिसत आहे असं असलं तरीही नाशिक मात्र या परिस्थितीत अपवाद ठरत आहे.
नाशिकमध्ये थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे शहरातील शासकीय आणि खासगी शाळा एक तास उशिराने भरणार असून, नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी बी टी पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून नाशिक शहराचा देखील पारा 9 ते 10 अंशापर्यंत खाली घसरला होता.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह नाशिक आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमानात घट नोंदवली जाईल. त्यानंतर म्हणजेच साधारण नव्या आठवड्याच्या सुरुवातीला मात्र तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सहसा मुंबईतील तापमानाचा आकडा 14 ते 15 अंशांवर पोहोचल्यानंतर शहरात थंडीचा कडाका वाढला असं गृहित धरलं जातं. उत्तरेकडे होणारी हिमवृष्टी आणि त्यानंतर देशभारत वाहणारे कोरडे वारे, शीतलहरी या साऱ्याचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं जातं. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये साधारण दोन ते तीन दिवस तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाते. सध्या मात्र शहरातील तापमान सामान्य श्रेणीत असून, थंडीची लाट किंवा तत्सम इशारा नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे कोकणातही हीच स्थिती कायम आहे. पुढील 24 ते 48 तासांमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश आणि 20 ते 21 अंशांदरम्यान राहणार असून, राज्यात किमान तापमानाचा सरासरी आकडा 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या घरात राहील असा अंदाज आहे.
सध्या सक्रीय असणारा पश्चिमी झंझावात आणि पश्चिमेकडून देशाच्या उत्तरेकडील पर्वतांमध्ये येणाऱ्या वाऱ्यांमुळं येथील मैदानी क्षेत्रावरही थंडीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रावर मात्र नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.