Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील वातावरण एकिकडे राजकारणामुळं तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र उत्तरेतील शीतलहरींमुळं राज्यात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीनं चांगलाच जोर धरला असून, निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडमध्ये तापमानाचा आकडा 11 अंशापर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमानाच अशीच घट अपेक्षित असून, बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसेल. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांना बोचरी थंडी जाणवणार असून, बहुतांश भागांमध्ये हीच स्थिती असेल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र फारसा गारठा नसल्यामुळं इथं तापमानातील वाढ अडचणी वाढवताना दिसेल.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील 48 तासांपासून तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्यामुळं अनेक भागांमध्ये सकाळी गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य मावळतीला गेल्यानंतरही थंडीचा कडाका वाढू लागल्यामुळं अनेक घरांबाहेर, चौकाचौकात आता शेकोट्या दिसण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील घाट क्षेत्रामध्ये आकाश निरभ्र आणि सकाळच्या वेळेत काही भागात धुक्याची हजेरी असेल. तर, तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
देशाच्या कोमोरिन भागामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण भारतातील तामिळनाडूपर्यंत ही स्थिती कायम असल्याची चिन्हं आहेत. दरम्यान, देशाच्या उत्तरेकडे मात्र पाकिस्तान आणि नजीकच्या हिमालयीन पर्वतरांगेवरून शीतलहरी वाहत येत असल्यामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. ज्याचे परिणाम येत्या काही दिवसांत महाराष्ट्रावरही दिसून येणार हे स्पष्ट होत आहे.