Maharashtra Weather News : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. काश्मीरमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरीही इथं पारा मात्र शून्य अंशांवर स्थिरावणार असल्याचा अंदाज असल्यामुळं या भागातून देशाच्या उर्वरित क्षेत्रांकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळं मध्य भारतासह महाराष्ट्रही पुरता गारठणार आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. ज्यामुळं राज्यात ही थंडीची लाट मुक्काम वाढवताना दिसेल. सध्याच्या घडीला निफाडमध्ये पारा 6 ते 7 अंशांदरम्यान असतानाच सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली आहे. इथं तापमान 4.1 अंशांवर असून, ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रात सध्या धुळे, निफाड, अहिल्यानगर, परभणी, गोंदिया, नागपूर, वर्धा, आणि बुलढाणा इथं तापमान 10 अंशांहूनही कमी असून, कोकणातील रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक 34.8 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, काश्मीरच्या खोऱ्यात मात्र रात्रीचा तापमानाचा आकडा काहीसा वाढल्याचं स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही इथं रक्त गोठवणारी थंडी मात्र पाठ सोडत नसल्याचच स्पष्ट होत आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे 3.4 अंशांवर असून, दिवसा त्यात काहीशी सुधारणा होत तापमान शून्यापर्यंत येत आहे. आयएमडीच्या माहितीनुसार 21 डिसेंबरपर्यंत काश्मीरमध्ये खोऱ्याच्या भागात हवा कोरडीच राहणार असून, यामुळं तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लक्षद्वीप आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये चक्राकार वाऱ्यांसाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, इथपासून अंदमानच्या समुद्रकिनारी भागापर्यंत चक्राकार वाऱ्यांमुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, त्याचे परिणाम थेट तामिळनाडू आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये दिसणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.