Maharashtra Weather News : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा संपायला आला असून राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरी अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. सध्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी जास्त होत आहे. त्यामुळे दुपारी ऊन्हाचा चटका बसत आहे, तर रात्री थंडी जाणवत आहेत. पण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला. किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली पोहोचलंय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात घट झालीय. नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी म्हणजेच 14.6 अंश सेल्सिअसची नोंद झालीय. तर जळगाव, महाबळेश्वर आणि पुण्यातील तापमानातही घट झालीय. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत कडाक्याची थंडी सुरु होण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितल्या आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहील. राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं चढ-उतार होऊ शकते. कोकणात आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे, तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्री हवेत गारवा जाणवत आहे.
नाशिक,पुणे प्रमाणे जळगावचे तापमान देखील कमालीचे घटले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच या ठिकाणी पारा घसरला होता. गेल्या 24 तासांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. या ठिकाणी 14.4 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर सांगली देखील 14.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
त्याचवेळी गेल्या 24 तासात पुण्याचे तापमान 15.2 अंश सेल्सिअस, जळगाव 15.8 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 15.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 17.8 अंश सेल्सिअस, सातारा 16.6 अंश सेल्सिअस, परभणी 18.3 अंश सेल्सिअस, नागपूर 18.6 अंश सेल्सिअस, सांगली 14.4 अंश सेल्सिअस तर अहिल्यानगरात 14.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.