'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?

Devendra Fadnavis Next CM of Maharashtra?: विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये अवघ्या काही दिवसांसाठी अजित पवारांबरोबर पहाटेची शपथ घेऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 18, 2024, 10:19 AM IST
'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता? title=
मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान (फाइल फोटो, सौजन्य - पीटीआय)

Devendra Fadnavis Next CM of Maharashtra? राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून जागावाटपाची चाचपणी सुरु झाली आहे. कोणला किती जागा मिळणार? कोण कुठून लढणार? यासारख्या चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दलही चुरस सुरु असून वेगवेगळी नावं समोर येत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमधील पक्ष एकमेकांना मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारुन डिवचताना दिसत आहेत. मित्रपक्षाच्या सहमतीशिवाय कोणतीही अधिकृत घोषणा न करण्याचं सर्वच पक्षांचं धोरण आहे. असं असतानाच आता राज्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जर-तरच्या भाषेत थेट मुख्यमंत्री कोण असेल हेच जाहीर करुन टाकलं आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण याबद्दल बोलताना बोलताना महाजन यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. खरोखरच असं झालं तर फडणवीस मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रीक साधतील.

दोन्हीकडून मुख्यमंत्रिपदावरुन टोलवाटोलवी

सत्ताधारी आणि विरोधी गटाकडूनही उघडपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करण्यात आलेलं नाही. तसेच ते थेट जाहीर होण्याची शक्यताही कमीच आहे. असं असतानाच दोन्ही बाजूने एकमेकांवर मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवारावरुन कुरघोडी सुरु आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असं महायुतीमधील पक्षांचा दावा आहे. स्वत: फडणवीस यांनी "उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकत नाही," असं म्हटलं आहे. या टीकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर देताना, "आधी महायुतीमधून मुख्यमंत्री कोण होणार हे सांगावं," असं आव्हान दिलं आहे. "शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असं फडणवीस ठामपणे सांगू शकतात का?" असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसेच स्वत: फडणवीस आणि पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचा उल्लेख राऊत यांनी मध्यंतरी पत्रकारांशी बोलताना खोचकपणे केला होता.

...तर फडणवीसच मुख्यमंत्री!

दोन्ही बाजूने ही तू-तू मैं-मैं सुरु असतानाच नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर ते देवेंद्र फडणवीसच होतील असं म्हटलं आहे. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस! मात्र आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत असं ते म्हणालेत. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं नमूद करायलाही ते विसरले नाहीत. प्रसारमाध्यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजनांनी, "आमच्याकडे एकच आहे. तो चेहरा म्हणजे माननिय देवेंद्रजी! जर भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील. या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत. आम्हाला काही अधिकार नाही. मात्र भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत," असं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस खरोखरच मुख्यमंत्री झाले तर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होतील. यापूर्वी ते 2014 ते 2019 हा पूर्ण पाच वर्षांचा काळ मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते राजकीय घडामोडींमुळे अवघ्या काही दिवसांसाठी दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते ते पहाटेच्या शपथविधी नाट्यानंतर. त्यानंतर 2021 च्या राजकीय सत्तानाट्यानंतर फडणवीसांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं.