छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'

Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.  

आकाश नेटके | Updated: Feb 2, 2024, 12:03 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...' title=

Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरुन अनेकांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिद्द छत्रपती शिवाजींसारखी असल्याचे गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं. त्यावर विरोधकांनी टीका केली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी वणीच्या परसोडा येथील शिव महापुरान कथेला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

वणी शहरालगत असलेल्या परसोडा येथे काशी शिवपुराण कथा सुरु आहे. गुरुवारी दुपारी यासाठी शर्मिला ठाकरे वणीत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी शरद पवारांबाबत भाष्य केलं.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

"विरोधी पक्ष असल्याने टीका करणे त्यांना भागच आहे. टीका केल्याशिवाय ते पुढची निवडणूक लढवूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य दैदिप्यमान आहे. त्यांना आपण देवासमान मानतो. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या पक्षातील लोक तुलना करतात. शरद पवारांना त्यांच्या पक्षातील लोक जाणता राजा म्हणतात. पण आपण जाणता राजा कोणाला म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो," असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

राज ठाकरेंचे विदर्भाकडे दुर्लक्ष

विदर्भ ठाकरे परिवारावर खूप प्रेम करतो. मात्र राजसाहेबांचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे त्यांनी विदर्भाचा तात्काळ दौरा करावा असे घरी गेल्या गेल्या राज आणि अमित या दोघांनाही सांगणार आहे, असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते गोविंदगिरी महाराज?

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरूष आपल्याला ( नरेंद्र मोदी ) मिळाले आहेत. ज्यांना जगदंबा मातेनं हिमालयातून भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलं आहे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन, ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी," असं गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं.