Maharashtra Politics: महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे सरकार येऊन एक वर्षाचा कालावधी उलटला. त्यात आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट देखील सामिल झाला आहे. यावेळी मोठा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यात राष्ट्रीवादीच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची खुर्ची मिळाली. आता इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं बोललं जातं आहे. मात्र यावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याची खदखद बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे.
आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जस आहे तस चालू ठेवावे. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखावू नये, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आता जे मंत्री आहे ते सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार खरच होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौ-यावर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ते केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्याहस्ते केंद्रीय सहकार संस्थेनं निर्माण केलेलं पोर्टलचं लॉन्चिंग होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.