हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : ग्रामीण भागातील पाणी योजना पूर्णत्वास जात असताना पाईप लाईनचे काम थांबवत जुना हिशोब पूर्ण करायला सांगत पैशाची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप पुण्याचे (Pune News) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) पाणी योजनेच्या उद्घाटन प्रसंगी खेडच्या मोई येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे.
ग्रामीण राजकारणात काही गणित ठरलेली दिसून येत असून राजकीय मंडळी ठेकेदारांकडे जुना हिशोब पूर्ण करण्याची मागणी करत आहे. या झारीतल्या शुक्राचार्यामुळे कामे थांबली जातात, अशी टीका चंद्रकांता पाटील यांनी केली आहे. यावेळी विकास कामांमध्ये टक्केवारी घेणाऱ्यांना चंद्रकांत पाटलांनी खडेबोल सुनावले. आहेत मात्र हे झारीतले शुक्राचार्य नक्की कोण अशी चर्चा सभेतच रंगली.
यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील रंगली. खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी सत्तेची गणिते कधीही पलटी होतील अशी टिपणी केली होती. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी मोहिते पाटील तुम्ही काही करा पुन्हा मोदीच येणार आहेत तुम्हाला पक्षांतर करता येत नसेल तर तुमच्या मुलाला पाठवा असे प्रत्युत्तर दिले.
कमळ चिन्ह ऐवजी मोदी चिन्ह आणा
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एका आजीचा किस्सा सांगितला. या आजीने भाजपने पक्षाचे चिन्ह कमळऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याचा सल्ला चंद्रकांत पाटील यांना दिला. "काय काम होतं आजी. तुम्ही पक्षाचे चिन्ह बदला. आम्ही आत मतदानाला गेलो की आम्हाला तुमचे चिन्ह काही सापडत नाही. तुम्ही पक्षाचे चिन्ह मोदी करुन टाका. मग ते सापडायला सोप्प पडेल. त्यामुळे मोहितेंना मी म्हणेल की काही करा 2024 साली मोदीच येणार. भविष्यात मोदींशिवाय काही नाही. तुम्हाला मुलगा असेल तर माझ्याकडे द्या कारण भविष्यात मोदींशिवाय काही नाही," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.