"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन राज्यात चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दोघांना लक्ष्य केले आहे. त्यावर आता फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 5, 2023, 04:31 PM IST
"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Cabinet Expansion : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेले अनेक दिवस याबद्दल फक्त तारखा समोर येत होत्या. मात्र आता राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनाआधीच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याला कारण आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दिल्ली वारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट सरकारच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

या दिल्लीवारीवरुन आता महाविकास आघाडीने सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीवारीतच जास्त वेळ घालवत आहेत. मला असं वाटतं की कायम दर दोन दिवसांनी दिल्लीवरुन बोलावणं येतं. दिल्लीतल्या दरबारामध्ये जाऊन हुजरेगिरी करण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतील, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

"नाना पटोले ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे प्रातःविधीसाठी जायचं असेल तर दिल्लीवरून हायकमांडची परवानगी लागते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे मग दिल्लीला गेलं तर काय वाईट आहे. संजय राऊत हे काय महत्त्वाचे नाही. मंत्रीमंडळ विस्तार होणारच आहे. तो केव्हा होणार हे मुख्यमंत्रीच तु्म्हाला सांगतील. काल आमची यासंदर्भात बरीच चर्चा झाली आहे. सगळ्या निवडणुका एकत्र लढायच्या त्यासाठी एकत्रित रणनिती तयार करायची आणि दोन्ही पक्षांमध्ये समन्वय घडवायचा अशी चर्चा झाली आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संजय राऊत यांची टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कधीही दिल्लीवाऱ्या केल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागत आहे. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करू द्या, असा अर्ज घेऊन त्यांना दिल्ली दरबारात उभं राहावं लागतं. दिल्ली त्यांच्यासाठी मक्का-मदिना आहे. ते मी समजू शकतो. मात्र, एकनाथ शिंदेंचे काय?," असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.