Amit Shah On Maharashtra Politics: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांसंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावरुन उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर युतीत एकत्र लढूनही हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मदतीने काँग्रेसबरोबर महायुतीचं सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पद स्वीकरालं. मात्र अडीच वर्षानंतर शिवसेनेतील मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला आणि त्यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर मागील वर्षीच या सरकारमध्ये राष्ट्रवादीमधून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट फुटून सहभागी झाला. मागील पाच वर्षातील या नाट्यमय घडामोडींचं खापर अमित शाहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर फोडलं आहे.
अमित शाह यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. "महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये काय झाल? तुम्हाला पुन्हा भूतकाळात जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणती गोष्ट बदलू इच्छिता?" असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाहांनी, "त्यावेळेस जे काही घडलं त्यामध्ये आम्हालाच (भाजपाला सर्वात मोठा) फटका बसला," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना शाह यांनी, "2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळालं होतं. शरद पवार यांनी आमचे मित्र उद्धवजींना (उद्धव ठाकरेंना) आमच्यापासून दूर घेऊन गेले. ते आमचे चांगले मित्र होते आणि दोघांनी युती करुन निवडणूक लढली होती. ज्यांनी कोणी हे सारं (हा सारा गोंधळ) सुरु केलं आहे त्यांनी हे संपवलं पाहिजे," असंही म्हटलं.
अमित शाहांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधताना, "त्यावेळेस नैतिकतेसंदर्भातील कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. तुम्ही पत्रकार म्हणून दुटप्पी धोरण अवलंबलं, असंही म्हटलं. अमित शाहांनी दिलेलं हे उत्तर ऐकून त्यांना पुन्हा, "तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाहांनी सध्या राज्यामध्ये भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर युतीत असल्याचं सांगितलं. अमित शाह यांनी ठाकरेंना पुन्हा सोबत घेण्यासंदर्भातील प्रश्नावर, "आमची सध्या युती असून सारं काही सुरळीत सुरु आहे," असं सूचक विधान केलं.
अमित शाहांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीने नोंदवली आहे. "2014 ला कोणी युती तोडली? याचा विचारही आपल्याला करावा लागेल. ती तोडल्यानंतरही आम्ही दोन पावलं मागे जाऊन आम्ही सर्व गोष्टी एकत्रित करुन सत्तेत सहभागी झालो. मात्र वारंवार तुम्ही भूमिका बदलला आणि आम्हालाही भूमिका बदलण्यास भाग पाडाल. त्यातून तुम्ही पाहिलं असेल तर त्यावेळेस एवढं नाट्य झालं की आम्ही विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्यासही तयार होतो. आताचे मुख्यमंत्री तेव्हा विरोधी पक्षनेते होते तरी देखील दोन पावलं पुढे जाऊन आम्ही युती धर्म पाळला आणि युतीत गेलो. त्यावेळेस काही जागांबद्दल देवाणघेवाण झाली का? त्यावेळेस आम्ही हट्ट धरला असता की आमचाच मुख्यमंत्री करा नाहीतर आम्ही नाही येणार. या सर्व गोष्टी पाहिल्यास त्यांनीच या गोष्टींबद्दल स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे," असं सचिन आहिर म्हणाले. आता अमित शाहांच्या या विधानावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया नोंदवते हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.