Ajit Pawar Devgiri Bungalow: राज्यात निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येतो. अशातच तुम्ही अनेकदा वर्षा, सागर, देवगिरी ही नावे तुमच्या कानावर पडली असतीलच. सरकार स्थापनेनंतर खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना शासकीय घरे दिली जातात. या शासकीय घरांना नावेदेखील देण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा हे तर सर्वांनाच माहिती आहे. राज्यातील घडामोडींचे व मुख्यमंत्र्यांकडून निर्णय हे वर्षावरुनच घेतले जातात. मात्र, पद गेल्यानंतर ते बंगलेदेखील सोडावे लागतात. मात्र तुम्हाला माहितीये का गेल्या 16 वर्षांपासून अजितदादांची देवगिरी या शासकीय बंगल्यात सत्ता कायम आहे. आत्तादेखील अजित पवारांना देवगिरी बंगलाच मिळणार का, अशी चर्चा आहे.
अजित पवारांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आत्तापर्यंत अजितदादांकडे विविध पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. सत्ता गेली, पद बदललं तरीदेखील त्यांचं शासकीय निवासस्थान मात्र कायम राहिलं. 1999 मध्ये अजित पवारांनी या देवगिरी बंगल्यात प्रवेश केला ते आजतागायत अजितदादा यांचे निवासस्थान तेच आहे. 1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सरकार होतं तेव्हा अजित पवार देवगिरी बंगल्यात राहायला गेले होते.
1999 ते 2014 पर्यंत ते या बंगल्यात राहत होते. 2014मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते तेव्हा मात्र हा बंगला त्यांना देण्यात आला होता. मात्र, 2019 मध्ये जेव्हा पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते पुन्हा एकदा देवगिरी बंगल्यात राहण्यासाठी आले.
2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार पडले आणि अजित पवार विरोधीपक्ष नेते असताना पण तरीही अजितदादा याच बंगल्यात राहिले. अजितदादांनी फडणवीसांना पत्र लिहून देवगिरी बंगला कायम राहावा यासाठी विनंती केली होती. फडणवीसांनीही ही विनंती मान्य केली होती. राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवारांकडे असणार असं परिपत्रक काढलं होतं. नंतर अजित पवार भाजपसोबत गेले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. तसंच, अजित पवारांसाठी देवगिरी बंगला भाग्यवान मानला जातो, अशाही चर्चा आहेत.