Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींनंतर 12 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता महायुतीमधील खातेवाटपासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हे बुधवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. असं असतानाच आता सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस आणि जे. पी. नड्डा रात्री उशीरा अमित शाहांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. या नेत्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत जवळपास दीड तास बैठक चालली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खातेवाटपामध्ये कसं सामावून घ्यायचं याबद्दल चर्चा झालेली असतानाच आता खातेवाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस काल दुपारी दिल्लीत पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. साडेचारच्या सुमारास ते गडकरींच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर फडणवीस केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या 17 ए अकबर रोड येथील निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहचले. इथून बाहेर पडल्यानंतर फडणवीस राष्ट्रपती भवनाच्या दिशेने सायंकाळी सहाच्या सुमारास रवाना झाले. ते भाजपाच्या मुख्यालयात पोहोचले. तिथे महाराष्ट्र भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. तसेच संघाचे बीएल संतोष बरोबर यांच्याबरोबर ही बैठक झाली.
रात्री साडेदहाच्या सुमारास फडणवीस कृष्ण मेनन मार्गांवरील अमित शाहांच्या बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यापाठोपाठ जे. पी. नड्डाही शाहांच्या बंगल्यावर हजर झाले. या तिघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा सुरु होती.
VIDEO | Maharashtra Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) and BJP president JP Nadda (@JPNadda) arrive at the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/EVL6ehSyw0
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2024
फडणवीसांनी शाह आणि नड्डांबरोबरच्या बैठकीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्याला सर्वच घटक पक्षांचा होकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या समिकरणानुसार विचार केल्यास भाजपानं सर्वाधिक म्हणजेच 131 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. सहा आमदारांमागे एक मंत्रीपद असा विचार केल्यास भाजपाच्या वाटल्याला जवळपास 20 मंत्रीपद येतील. तर शिंदेंच्या शिवसेनेला 12 जादा मिळू शकतात. अजित पवारांच्या पक्षाला 10 मंत्रीपदं दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ढोबळमनाने 6 आमदारांमागे एक मंत्रिपद असं हे सूत्र असल्याचं समजतं.
खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं राहणार हे निश्चित करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. खातेवाटप करताना गृहखात्यावर दावा ठोकलेल्या शिवसेनेची महसूल खात्यावर बोलवण होण्याची शक्यता आहे. तर हेविवेट असलेल्या अजित पवारांना गृहनिर्माण खातं दिलं जाऊ शकतं. 'झी 24 तास'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा स्वतःकडं नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती ठेवण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला महसूल सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती जातील अशी चर्चा आहे.