कर्जमुक्तीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' आहेत मोठ्या घोषणा

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.  

Updated: Dec 21, 2019, 04:58 PM IST
कर्जमुक्तीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' आहेत मोठ्या घोषणा title=
संग्रहित छाया

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत हे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच सिंचन प्रकल्पाची कामे जी कामे राहिली आहेत, ती आधी पूर्ण केली जातील. तसेच राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 

समृद्धी महामार्गासाठी आता राज्य सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच समृद्धी महामार्गाचं काम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचत समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचंही त्यांनी नमूद केले. तसेच १० रुपयांत थाळी ५० ठिकाणी आधी सुरु करण्यात येणार आहेत. शिव भोजन देणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारले जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० रूपये अधिक देण्यात येतील. पूर्ण विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मदत करण्याची विनंती केली. मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

 

नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय म्हटलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत...

- कुणाचं मन दुखावलं असेल तर क्षमा

- प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार

- कोणत्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती नाही

- नादुरुस्त कालव्यांसाठी मोहीम हाती घेणार

- सगळे अडथळे दूर करून कामं पूर्ण करणार 

- विदर्भासाठी देवेंद्र फडणवीसांची मदत लागणार, सहकार्याबद्दल विरोधकांचे आभार 

- विदर्भात स्टील प्रकल्प उभारणार, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उभा राहिल

- समृद्धीमुळे ५ लाख लोकांना रोजगार मिळणार

- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार

- प्रकल्पांना स्थगिती नाही तर सुधारणा 

- उद्योग, पर्यटणाचा विचार करणार... भात-शेती मिशन राबवणार 

- आदिवासींचा पैसा आदिवासींसाठी खर्च होणार... आदिवासींचा विकास करण्याकडे कल

- लोणार सरोवरासारख्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणी पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करून देणार

- गोरगरिबांना १० रुपयांना शिवभोजन देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी केला जाहीर 

- राज्यात सुरुवातीला ५० ठिकाणी मिळणार शिवभोजन

- राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर... २ लाखांपर्यंतचं सर्व कर्ज माफ... ३० सप्टेंबर २०१९ पासून कर्ज माफ 

- सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सभात्याग