Thackeray Vs Thackeray: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीला आठवडाभराचा कालावधी उरलाय. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका लावण्यात आलाय. यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभेत बॅग तपासणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. यावरुन आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय.
उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला राज ठाकरे कसं उत्तर देतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.उद्धव ठाकरेंची बॅग निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं तपासल्यावरुन राज ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली. कुणाची बॅग तपासायची याचं भानही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना राहिलं नसल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय. उद्धव ठाकरेंनी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, केलेल्या उलटतपासणीचीही राज ठाकरेंनी फिरकी घेतली.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. गेल्या 20 वर्षांत राज ठाकरेंनी केली तशा प्रकारची आपण टीका केली नसल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंचे संस्कारच काढले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करतायेत. त्यांनी आतापर्यंत आदित्यवर बोचरी टीका केली नव्हती... पण आता आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीकेचे बाण सोडलेत. त्यामुळं राज ठाकरे त्यांच्या स्टाईलनं आदित्य यांचा समाचार घेतील अशी दाट शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. टीका करताना मर्यादा पाळतो. आमच्यावर संस्कार वेगळे आहेत. 20 वर्षांत कधी अशी टीका केली का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना विचारलाय. दरम्यान, 2 पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगेत काय सापडणार? बॅगमध्ये हातरुमाल आणि कोमट पाण्याची बाटली असेल. बॅग तपासणीचं अवडंबर कशाला? असा खोचक टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय.
कोकणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किल्ले राजकोटवरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा मुद्दा केला जातोय. विरोधक पुतळ्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. कोकणात प्रचारसभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुतळ्यावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सावंतवाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळाप्रकरणावरून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच कणकवलीतील मविआ उमेदवाराच्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि अमित शाहांवर टीका केली. नकली सेना म्हणणारे बे अकली असल्याचं म्हणत त्यांनी अमित शाहांना टोला लगावलाय. तर राणेंना साईज प्रमाणं मंत्रिपद मिळालं होतं म्हणत नारायण राणेंनाही टोला लगावला.
14 तारखेला संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे... सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे. याच मैदानावर संभाजीनगर किंवा औरंगाबाद अशी हाक बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.. त्यामुळे शिवसेना आणि मैदानाचं एक भावनिक नातं आहे.. या ऐतिहासिक मैदानावर उद्धव ठाकरें यांची जोरदार सभा होईल असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.तसंच उद्या मोदींचीदेखिल सभा आहे.. जनतेला कळेल कोणाची सभा मोठी आहे, असंही दानवे यावेळी म्हणाले.