Marriage is a Campaign Issue: बीडमधल्या प्रचारात थेट लग्नाचा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी लग्नाळू मुलांच्या मुद्याला हात घातलाय. आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
लग्न हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?... परळीत लग्न हा निवडणुकीचा मुद्दा झालाय. इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेबांनी अनेक लग्नाळू मुलांच्या आवडत्या विषयालाच हात घातलाय. आमदार म्हणून निवडून दिलं तर सगळ्या पोरांची लग्न लावून देण्याचं आश्वासन राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. हाताला काम नाही...त्यामुळे पोरीचा बाप पोरगी देत नाही.अशा लग्नाळू मतदारांची संख्या परळीत लक्षणीय आहे. या सगळ्या लग्नाळू मुलांचं पितृत्व राजेसाहेब देखमुखांनी घेतलंय. आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून टाकू, असा शब्दच राजेसाहेबांनी दिलाय.
राजेसाहेबांच्या या वक्तव्याची त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेंनी मात्र चांगलीच फिरकी घेतली. राजेसाहेब ज्या काँग्रेस पक्षात होते त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचं अजून लग्न झालेलं नाहीय आणि ते काय आमच्या मुलांची लग्न लावून देणार, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय.
निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. राजकीय चिखलफेक सुरू होते. मात्र परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी समस्त लग्नाळू मुलांच्या मुद्याला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलंय. हा मुद्दा वरकरणी गंमतीचा वाटत असला तरी तितकाच गंभीरही आहे. ग्रामीण भागातल्या विशेषत: शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. नोकरी नसणा-या मुलांची लग्नं होत नाही आहेत. त्यामुळे राजेसाहेब देशमुखांच्या मागे समस्त लग्नाळू मंडळी उभी राहणार का, हे निकालानंतरच समजणार आहे.
महाराष्ट्रात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. त्यामुळं बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे भाऊबहीणीचं मनोमिलन झालं. या मनोमिलनाचा आनंद सामान्यांना झाला. पण वर्षानुवर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांना विस्थापित होण्याची वेळ आलीय. येत्या दिवसांत भाजपमधील अनेक नेते हाती तुतारी घेण्याची शक्यता निर्माण झालीय.
बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये.वर्षानुवर्षे राष्ट्रवादीविरोधी राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची महायुतीमुळं राजकीय अडचण झालीय. माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे , माजी आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार रमेश आडसकर अस्वस्थ आहेत. यातले सुरेश धस यांच्यासारखे काहीजण शेवटची आशा म्हणून मुंबईवारी करुन पक्षातून पुनर्वसन केलं जाईल या आशेवर आहेत.