महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर? पवारांचा रोख कुणावर?

Sharad Pawar on Mahayuti: शरद पवारांनी महायुतीविरोधात रसदेचा फटाका फोडलाय. याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 2, 2024, 09:00 PM IST
महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर? पवारांचा रोख कुणावर? title=
शरद पवार

Sharad Pawar on Mahayuti: विधानसभा निवडणुकीसाठी 1 महिन्याचा कालावधी राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केलाय. शरद पवारांनी पोलिसांवर आरोप केला असला तरी त्यांचा रोख गृहमंत्री फडणवीसांवर आहे हे लपून राहिलेलं नाही. फडणवीसांनीही या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय. शरद पवारांनी महायुतीविरोधात रसदेचा फटाका फोडलाय. याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.

'मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न'

विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची चिन्हे दिसू लागलीयेत. त्यामुळं मतदारांचं एक-एक मत मिळवण्यासाठी उमेदवार जिवाचं रान करताना दिसतायत. निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता असल्यानं मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा शरद पवारांना संशय आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जात असल्याची चर्चा पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये असल्याचं पवारांनी सांगितलंय.

'पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात'

उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचं जे अर्थसहाय्य करण्याचं संबंधिचं काम केलं जातं, निवडणुकीला, त्यासाठी  पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यांतून रसद पाठवली जाते असं काही या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा ऐकायला मिळतं. माझ्या हातात ऑथेंटिक अधिक अधिक माहिती असती तर याच्यावर वाटेल ते केलं असतं. माझा स्वभाव पूर्ण माहितीशिवाय भाष्य करण्याचा नाही

फडणवीसांचा पलटवार 

शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीसांनी पलटवार केलाय. शरद पवार सत्तेत होते त्यावेळीच पोलिसांच्या वाहनांचा वापर उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी केला जात होता असं लोकं सांगत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय.शरद पवारांना आता त्याचाच भास होत असल्याचा प्रत्यारोप फडणवीसांनी केलाय.

आरोपांच्या फैरी सुरुच राहणार 

विरोधकांचा पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांच्या नियुक्तीला आक्षेप आहे. त्यातच पवारांनी उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त केलाय. या आरोपांच्या निमित्तानं शरद पवार आणि फडणवीसांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु झाल्यात. प्रचार संपेपर्यंत असे आरोप थांबणार नाहीत हे अधोरेखित झालंय.