Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे.  

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2024, 05:24 PM IST
Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...' title=

Ajit Pawar on Narendra Modi Rally: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाहदेखील आता प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले असून, त्यांच्या सभा पार पडल्या आहेत. महायुतीत सर्व काही आलबेल असताना अजित पवारांचं मात्र भाजपाशी फारसं पटत नसल्याचं दिसत आहे. याआधी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना महायुतीत सहभागी करण्यावरुन टीका केली होती. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत. इतकंच नाही, तर भाजपाने नवाब मलिकांना विरोध केलेला असतानाही अजित पवार त्यांच्या प्रचार करताना दिसत आहेत. 

राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे. महत्त्वाचं म्हणजे, योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी वाशिममधील प्रचारसभेत 'अपने बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा पुनरुच्चार केला होता. 

'महाराष्ट्राला अशी विधानं आवडत नाहीत'

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, "राज्यातील जनतेला अशा टिप्पण्या आवडत नाहीत. राज्यातील जनतेने नेहमीच जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे." 

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचा आहे. इतर राज्यांशी तुम्ही महाराष्ट्राची तुलना करू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला ते आवडत नाही. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची शिवाजी महाराजांची शिकवण होती". 

"जेव्हा इतर राज्यातील लोक येथे येतात, ते स्वतःच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून विधाने करतात, परंतु महाराष्ट्राने हे कधीच मान्य केलं नाही आणि हा इथल्या सर्व निवडणुकांचा इतिहास आहे," असंही अजित पवार म्हणाले. 

'बारामतीमधील लढत कुटुंबातच'

दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मतदारसंघात सभा का घेणार नाही? असं विचारलं असता त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, बारामतीतील लढत कुटुंबातील आहे. 

बारामती मतदारसंघातील लढाई कुटुंबातील असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत प्रचारसभा न घेण्याची विनंती केल्याचं अजित पवारांनी सागितलं आहे. "माझ्याकडे कोणीही येऊ नका असं सांगितलं आहे. उर्वरित 287 मतदारसंघात आपल्याला फार काम आहे. ती वेळ आणि तेथील भाषण आपण दुसरीकडे खर्च करु शकतो. मी माझी सभा घेण्यास. प्रचार करण्यास सक्षम आहे", असं अजित पवार म्हणाले आहेत.

नवाब मलिक आणि मुलगी सनासाठी निवडणूक प्रचार

भाजपा विरोध करत असतानाही अजित पवारांनी गुरुवारी नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक यांच्यासाठी प्रचार केला. भाजपाने आपण नवाब मलिक यांचा प्रचार अजिबात करणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. भाजपाने दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. 

अजित पवार यांनी नवाब मलिक आणि सना यांच्यासोबत मुंबईत खुल्या जीपमधून सभा घेऊन मतदान करण्याचं आवाहन केले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांची ऑगस्ट 2023 मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली. मलिक यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यास विरोध करणाऱ्या सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमध्ये भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. मात्र, भाजपाने सना मलिक यांच्या नावावर आक्षेप घेतलेला नाही कारण तिच्यावर असे कोणतेही प्रकरण नाही.