Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा प्रचार रंगात आला आहे. तर, दुसरीकडे बंडखोरांमुळे महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अशाकत बंडखोरांवर कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेना शिंदे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जालना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, कन्नड तालुकाप्रमुख केतन काजे, तसेच पालघरचे प्रकाश निकम यांचे पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून निलंबित केले आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारसीने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण पूर्व शिवसेना बंडखोर शहर प्रमुख महेश गायकवाड याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीये.... महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केलीये. तर शिवसेना माजी नगरसेवक विशाल पावशे सुद्धा वंचित कडून कल्याण पूर्व मधून उमेदवार म्हणून उभे राहिल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यात आलीये.
जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई सुरू करण्यात आलीये..जळगाव शहर मतदार संघातील बंडखोर अपक्ष कुलभूषण पाटील आणि एरंडोल मतदार संघातील बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे...
मुंबईत वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणारे राजू पेडणेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना UBTनं वर्सोवामधून हारून खान यांना उमेदवारी दिली असून, राजू पेडणेकर इथून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पक्षविरोधी कारवाय केल्याचा आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यासोबतच रूपेश कदम यांचीही हकालपट्टी करण्यात आलीये. रुपेश कदम दिंडोशीमधून अपक्ष निवडणूक लढत आहेत... आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रुपेश कदम युवासेनेचे कार्यकारणी सदस्यही होते. याखेरीज मोहित पेडणेकर, भाग्यश्री आभाळे, गोविंद वाघमारे यांच्यावरही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करणा-या भाजपसमोर बंडखोरांनी टेन्शन निर्माण केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांची मनधरणी केल्यानंतरही बंडोबां तलवार म्यान करायला तयार झाले नाहीत. अशांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पक्षशिस्त म्हणून तब्बल 40 बंडखोरांना भाजपनं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं. भाजपनं केलेल्या या कारवाईत काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.सोलापूर उत्तरमधील शोभा बनशेट्टी, श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते, अमरावतीचे जगदीश गुप्ता आणि बडेनेरातील तुषार भारतीय यांचा समावेश आहे.