Maharashtra Assembly Election NOTA Votes: एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मत देण्यासाठी पात्र नसल्याचं वाटत असल्यास 'नोटा' हा पर्याय निवडण्याची मूभा मतदारांना असते. 'नोटा' (NOTA) चा फूलफॉर्म ‘नन अदर दॅन अबाऊ’ असा असतो. या अर्थामध्येच वरील यादीमधील कोणताही उमेदवार पसंत नसेल तर मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असतो. हा पर्याय कायम उमेदवारांच्या यादीच्या तळाशी असल्याने त्याला नोटा हे नाव देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 288 पैकी 11 मतदारसंघांमध्ये नोटाला पडलेल्या मतांची संख्या लक्षणिय होती. नोटाला मिळालेल्या मतांची संख्या इतकी होती की कोणताही उमेदवार नकोसाठी पडलेली मतं ही त्या मतदारसंघांमधील विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षाही अधिक होती.
2019 च्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे एकूण 20 मतदारसंघ असे होते की ज्यात विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा केवळ 68 ते 1936 कमी मते 'नोटा'ला पर्यायाला मिळाली होती. म्हणजेच एकूण 38 मतदारसंघांमध्ये 'नोटा'ला फारच जास्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. अगदी उदाहरणासहीत सांगायचे झाले तर 'काय झाडी, काय डोंगर' फेम सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे अवघ्या 768 मतांनी जिंकले होते. या ठिकाणी नोटाला 700 मतं होती. म्हणजेच विजयी मताधिक्यापेक्षा अवघी 68 मतं कमी एवढी मत नोटाला मिळालेली. जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील हे 1957 मतांनी विजयी झाले होते. या ठिकाणी नोटाला 1806 म्हणजेच विजयी मताधिक्यापेक्षा केवळ 151 मतं कमी होती.
2013 साली पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना नोटाचा पर्याय देण्याचा आदेश दिलेला. तेव्हापासून ईव्हीएमवर नोटाचा पर्याय द्यायला सुरुवात झाली. सर्वात आधी हा पर्याय छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश आणि नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात देण्यात आली.
मतदारसंघ विजयी उमेदवार मताधिक्य पक्ष नोटा मते
खडकवासला भीमराव तापकीर 2595 भाजप 3561
कोपरगाव आशुतोष काळे 822 राष्ट्रवादी 1622
अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा 2592 भाजप 2617
उल्हासनगर कुमार आयलानी 2004 भाजप 4978
दौंड राहुल कुल 746 भाजप 917
डहाणू विनोद निकोले 4707 माकप 4824
चांदिवली दिलीप लांडे 409 शिवसेना 3360
भिवंडी पूर्व रईस शेख 1314 सपा 1358
अक्कलकुवा के.सी. पाडवी 2096 काँग्रेस 4857
बोईसर राजेश पाटील 2752 बविआ 4622
अर्जुनी मोरगाव मनोहर चंद्रिकापुरे 718 राष्ट्रवादी 1327