'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

Loksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.

Updated: Jun 19, 2024, 03:12 PM IST
'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...'  नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस title=

Loksabha Result 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurga Loksabha Constituency) नारायण राणे (Narayan Rane) यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस (Legel Notice) ठाकरे सेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निवडणुक आयोगाला पाठवली आहे. 

काय आहे नोटिशीत?
निवडणुक प्रचार कालावधी 5/5/2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6/5/2024 ला सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटिस मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले 'जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही' अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख नोटिस मध्ये करण्यात आलेला आहे. 

निवडणुक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणुक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिस मधून केलेली आहे. 

केंद्रीय निवडणुक आयोगाने 7 दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसंच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असं माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. त्याबाबत नागरिक म्हणुन भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.