LokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.

Updated: Mar 26, 2024, 02:57 PM IST
LokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा? title=
LokSabha Elections First Phase in Maharashtra Congress ticket distribution Kunbi card will be beneficial

धनंजय शेळके, झी मीडिया मुंबई (Loksabha Election 2024) : विदर्भात नागपूर, रामटेक, अमरावती, भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जागांवरचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. बुलढाणा, यवतमाळ-वाशिम या जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे. वर्ध्याची जागा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. तर अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयामुळे अजून जाहीर करण्यात आली नाही. वंचित इंडिया आघाडीत आले तर अकोल्याची जागा आंबेडकरांना दिली जाणार आहे. ते आघाडीत आले नाही तर मात्र काँग्रेस तिथे उमेदावर देणार असल्याचं कळतंय.

तिकीट वाटपात काँग्रेसमध्ये अनेकवेळा गोंधळाचं वातावरण असतं. स्थानिकांच्या शिफारशी धुडकावून हायकमांडकडून उमेदवारी जाहीर केली जाते.  यावेळी मात्र काँग्रेसनं कमीत कमी विदर्भात तरी तिकीट वाटप करताना शहाणपण दाखवल्याचं दिसून येतंय. रामटेकमध्ये काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना तिकीट दिलंय. त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. तसंच मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या सुनील केदार यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याच शिफारशीवरुन रश्मी बर्व्हे यांना तिकीट देण्यात आलं आहे. (LokSabha Elections First Phase in Maharashtra Congress ticket distribution Kunbi card will be beneficial)

अमरावतीमध्ये दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. वानखेडे यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक आहेत. यशोमती ठाकूर यांच्या शिफारशीवरुनच त्यांना तिकीट देण्यात आल्याचं बोललं जातंय. भंडारा – गोंदियात नाना पटोलेंनी उमेदवार ठरवला तर गडचिरोली – चिमूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पसंतीचा उमेदवार रिंगणात उतरवल्याचं बोललं जातंय. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार यांच्या दबाव झुगारून प्रतिभा धानोरकर यांना पक्षानं पसंती दिल्याचं दिसून येतंय. तर नागपूरमध्ये सर्व गटतट एकत्र येऊन विकास ठाकरे यांची शिफारस केली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने विदर्भात कुणबी कार्ड खेळल्याचं दिसून येतंय. नागपूर, भंडारा-गोंदिया, चंदपूर या तीनही खुल्या मतदारसंघात कुणबी उमेदवार दिले आहेत. उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसनं शहाणपण दाखवलं आहे. याचा त्यांना किती फायदा होतो ते 4 जूनला दिसून येईल.

विदर्भातील अशा असणार लढती

नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध आ.विकास ठाकरे (काँग्रेस)
रामटेक - राजू पारवे (एकनाथ शिंदेंची शिवसेना) विरुद्ध रश्मी बर्वे (काँग्रेस)
गडचिरोली - अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
भंडारा - गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)