लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला 4 पैकी फक्त 1 जागा जिंकता आली आहे. रायगडमधून सुनील तटकरे (Sunil Tatkare) हा एकमेव विजय अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीतील या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दावा फेटाळला आहे. सर्व आमदार एकत्र असून, या अफवा आहेत असा दावा केला जात आहे.
"आमचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा जाणुनबुजून पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत आणि एक टीम आहोत. अशा अफवा आणि खोटे व्हिडीओ निवडणुकीच्या वेळीही पसरवले जात होते." असं सुनील तटकरे यांनी कोअर टीम बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला. भाजपाला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळाला. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली.
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित अपयश मिळाल्यानंतर आढावा घेण्यासाठी अजित पवार गटाने बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते आणि मंत्री दक्षिण मुंबईतील देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. आज संध्याकाळीही अजित पवार गटाची बैठक पार पडणार आहे.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी आणखी एक बैठक होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
“आम्ही विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतील," असं ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीचे नेते एकत्रित येऊन निर्णय घेतील. आज संध्याकाळच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार येतील. जे पूर्वी आमच्यासोबत होते ते सगळे आमदार आजदेखील सोबत आहेत. आमदारांचा झालेल्या निवडणुकी संदर्भात मत काय आहे हे जाणून घेतलं जाईल. अजित पवार, प्रफुल पटेल आणि खासदार एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.