LokSabha: 'माझ्याइतकं इंग्रजी बोलून दाखवा', म्हणणाऱ्या सुजय विखेंना निलेश लंकेंचं उत्तर, 'माझं कुटुंब...'

LokSabha: मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं जाहीर आव्हान भाजपा उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं आहे. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 05:21 PM IST
LokSabha: 'माझ्याइतकं इंग्रजी बोलून दाखवा', म्हणणाऱ्या सुजय विखेंना निलेश लंकेंचं उत्तर, 'माझं कुटुंब...' title=

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकतंच भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी थेट निलेश लंके यांच्यावर निशाणा साधत जाहीर आव्हान दिलं आहे. मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

अहमदनगर शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंवर टीका केली. निलेश लंकेंनी महिनाभरात जरी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे.

"मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून तरी बोलावं. निलेश लंकेंनी इतकी इंग्रजी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही," असं सुजय विखे पाटील म्हणाले. 

निलेश लंकेंचं प्रत्युत्तर

"मी सामान्य कुटुंबातील मुलगा असून जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. माझं कुटुंब सर्वसामान्य आहे. माझं कुटुंब मला शहरात, इंग्रजी मीडियममध्ये शिक्षण देऊ शकत नव्हतं. पण याचा अर्थ आम्ही राजकारण करु शकत नाही असा होत नाही. समाजकारण करताना भाषेचा प्रश्न येत नाही. मातृभाषेतून संसदेत प्रश्न मांडू शकतो," असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं आहे. 

रोहित पवारांची पोस्ट

सुजय विखे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार यांनीही त्यांना सुनावलं आहे. "लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजतं की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही.  टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील," असं सांगत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींचा उल्लेख केला.