Congress Ramtek Candidate Rashmi Barve : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात आला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 27 मार्च होती. यानुसार काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबतत्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रदेखील सादर केले होते. पण उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला होता.
त्यानंतर रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द केला जाणार का याची चर्चा रंगली होती. याबद्दल नुकतंच रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्याने निवडणूक अधिकाऱ्यांसमोर युक्तीवाद केला. तर रश्मी बर्वे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाकडून त्यांची बाजू मांडत युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्याने दोन्हीही बाजू ऐकून घेत रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द केला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
यानंतर रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "एक सर्वसामान्य घराण्यातील अनुसुचित जमातीतील महिलेची इतका यांना भीती वाटली की, आज मला 10 वाजता जात पडताळणी समितीने बोलवले. मला याचे पत्र 10 वाजता मिळाले. मला माझ्या वकिलासोबत चर्चा करण्याची कोणतीही संधी न देता लगेचच 11 वाजता जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध आहे, अशी हुकुमशाही सरकारने चालवली आहे. हे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ याच्या घोषणा देतात, आज मी शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे. तरी या सत्तेला मी घाबरणार नाही. माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि जनतेच्या विश्वासासाठी ही रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे. मी अबला नाही, मी सबला आहे."
"दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा एक नारी रुप घेते, तेव्हा भस्मासूर, महिषासूरसारख्या राक्षसाचा विनाश करते. त्यामुळे या सरकारचेही जास्त दिवस राहिलेले नाहीत आणि हे सरकार लवकरच पडेल. यांना विरोधक संपवायचे आहेत. जो यांच्या विरोधात उभा राहतो, त्यांच्या मागे असले कट कारस्थान हे सरकार करतं. या सरकारला लाज वाटायला हवी. एका शेतकऱ्याच्या, अनुसुचित महिलेचे जात प्रमाणपत्र तुम्ही अवैध आहे, असं तुम्ही तासाभरात ठरवता, हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? ही सरकारची हुकुमशाही आहे आणि ती जास्त काळ चालणार नाही. मी एक नारी आहे आणि माझ्यासोबत माझा पूर्ण समाज ताकदीने उभा आहे", असे रश्मी बर्वे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान रश्मी बर्वेंच्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचं नाव देण्यात आलं आहे. रश्मी बर्वेंनी प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्याम बर्वे यांचं नाव दिले होते. त्यांचे पती श्याम बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे आता श्याम बर्वे हेच काँग्रेसचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.