प्रताप नाईक / कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय. ही निवडणूक एकतर्फी नसून, अतिशय चुरशीची होत आहे. गटातटाच्या राजकारणात कोण कोणाला मतदान करणार याचा केवळ अंदाज बांधला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक आत्ता दुरंगी बनली असून ही निवडणूक पक्षीय पातळीवर न रहाता गटातटाच्या पातळीवर पोहोचली आहे. देशात एक वातावरण आणि कोल्हापुरात एक वातावरण अस चित्र सध्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
गटातटाच्या राजकारणामुळे दरवेळी गाजणारी कोल्हापूर लोकसभा निवडणूक यंदा थोडी जास्तच लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि काँग्रेसमधून त्याला मिळणारी फोडणी यामुळे कोल्हापूरच्या प्रचारात रंगत भरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या पाठिशी तर, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादी उमेदवारासोबत दिसत आहे. त्यामुळे कोण कुठला? कोणाचा? तुमचा की आमचा? असा गोंधळ सध्या प्रचारात दिसतोय. या सगळ्यात ‘आपलं ठरलंय’ या कॅम्पेनची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
कोल्हापूरचे राजकारण सध्या विद्यमान खासदार धनंजय महाडिक, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याभोवती फिरत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या बाजूने निकाल लागला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची साथ मिळाल्यानेच खासदार महाडिक यांना ही किमया साधता आली, असा दावा पाटील आणि मुश्रीफ यांच्या गटांकडून होतो. तर, विजय महाडिक गटामुळे आणि धनंजय महाडिक यांच्या करिष्मामुळे झाला, असं महाडिक गटाचं म्हणणं आहे. पण, २०१४ मध्येच विधानसभा निवडणुकीत सगळी गणिते बदलली. आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात खासदार महाडिक यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली. सतेज पाटील यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाची सल घेऊनच त्यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकारण केले. “विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी आपल्याला मदत केली नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना मदत करायची नाही. हे आता ‘आपलं ठरलंय’,अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यामुळे आमदार पाटील यांची सगळी रसद शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठिशी पुरवली जात आहे. सुरुवातीला खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा तिकिट देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादीतल्याच काही स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्यापुढे मांडली होती. तर, आमदार सतेज पाटील यांनी ‘हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, उमेदवार आम्ही देऊ,’ असे म्हटले होते. पण, शरद पवार खासदार महाडिक यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले.
उमेदवारी धनंजय महाडिक यांनाच मिळाली. पण, आमदार सतेज पाटील यांनी ‘आपलं ठरलंय’, असं सांगत महाडिक यांच्या विरोधी भूमिका जाहीर केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असूनही आमदार सतेज पाटील महाडिक यांच्या प्रचारात नाहीत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही महाडिकांच्या प्रचारापासून फारकत घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वेळा कोल्हापूरचा दौरा केला. त्यात सतेज पाटील आणि शरद पवार यांची भेट होऊन महाडिक-पाटील पॅचअप होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, पवार यांनी आमदार पाटील यांची फारशी दखल घेतली नाही. पण, दौरा संपवून जाताना त्यांनी ‘आपलं ठरलंय’ या भूमिकेचा उल्लेख करून ‘आता मी बी ध्यानात ठेवलंय’, असा इशारा सतेज पाटील यांना दिला.सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ‘आपलं ठरलंय’; मी बी द्यानात ठेवलंय आणि 'जनतेचं ठरलंय' अस कॅम्पेन सुरु आहे... ही कॅम्पेन सुरू असतानाच खासदार महाडिक गटाकडून राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे राष्ट्रवादिला मदत करणार असल्याची चर्चा घडवून आणली जात आहे.
या सगळया भेसळीमूळ कोल्हापूर च्या राजकारणात नेमकं कोण कुणाला मदत करत आहे, याचा अंदाज बांधणे सर्वसामान्य मतदारांना कठीण झाला आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा निवडणुक ही पक्षीय पातळीवर न रहाता आत्ता गटा तटाच्या भोवती फिरत आहे. दुसरीकडे चंद्रकांत दादा देखील या गटा तटाच्या राजकारणाला कंटाळून त्याच्या बद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवाबाबत महाडिक यांना चांगलाच दम भरलाय. सुरुवातीला कोल्हापूर लोकसभा निवडणूक पक्षीय पातळीवर होती. पण आत्ता मात्र गटा तटाच्या भोवती ही निवडणूक फिरत असल्यामुळे कोणाचं पारड जड आहे हे भाकीत करण धाडसच बनले. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.