रॉक बॅण्डच्या कॉन्सर्टसाठी अंधेरी ते नेरुळपर्यंत धावणार भाड्याची लोकल

 नवी मुंबईत यूटू बॅण्डच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी ही लोकल भाड्यानं घेण्यात आली.

Updated: Dec 13, 2019, 07:31 PM IST
रॉक बॅण्डच्या कॉन्सर्टसाठी अंधेरी ते नेरुळपर्यंत धावणार भाड्याची लोकल title=

स्वाती नाईकसह देवेंद्र कोल्हटकर झी २४ तास मुंबई : मुंबईकरांना रोजचा लोकलचा प्रवास कधी चुकलेला नाही. जिथे लोकल जात नाही तिथे रिक्क्षा, टॅक्सी भाड्याने घ्यावी लागते. पण आता रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर नव्हे...तर चक्क लोकलच भाड्याने घेण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. याआधी असा प्रकार कोणाच्या ऐकण्या-वाचण्यात नव्हता. पण असे प्रत्यक्षात घडले आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाडेतत्वावरची लोकल धावणार आहे. नवी मुंबईत यूटू बॅण्डच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी ही लोकल भाड्यानं घेण्यात आली.

Image result for mumbai local zee news

मुंबईच्या लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नवीन गोष्ट घडणार आहे. १५ डिसेंबरला उपनगरिय रेल्वे रुटवर पहिल्यांदाच भाड्याची लोकल धावणार आहे. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये यू-टू या आयरिश बॅण्डचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे.  या शोसाठी येणाऱ्या चाहत्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चक्क सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली लोकलच भाड्यानं घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या लोकलमधून प्रवास करण्य़ासाठी तुमच्या खिशात फक्त लाईव्ह कॉन्सर्टचा पास असणं आवश्यक असल्याचे आयआरसीटीसी ग्रूप मॅनेजर राहुल हिमालयीन यांनी सांगितले.

प्रेक्षकांनी येताना वाहनं घेऊन येऊ नये असं आयोजकांनी सांगितलंय. यासाठी डीवाय पाटील स्टेडियममध्ये पार्किंगच ठेवण्यात आलेली नाही. अंधेरीपासून ही लोकल निघणार असल्याचे राहुल म्हणाले. 

लाईव्ह कॉन्सर्ट म्हटल्यावर पोलिसांच्या पोटात गोळा येतो. वाहतूकीचं नियोजन करताना नाकीनऊ येतात. पण यू-टू बॅण्डनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी घेतलेला पुढाकार खरंच कौतुकास्पद आहे.