पुणे : लोणावळा जवळच्या अॅम्बी व्हॅलीमधल्या सहारा तलावाशेजारी ट्रॅपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झालाय. यासंदर्भात वन्यजीवरक्षक संस्थेनं वनखात्याशी संपर्क साधला पण बिबट्या त्या जागेत मेला नसल्याची उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे वन्यप्रेमींना बिबट्याच्या मृत्यूवर संशय निर्माण करत याच्या चौकशीची मागणी केलीय. बिबट्याबद्दल माहिती मिळताच वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य तात्काळ अॅम्बी व्हॅलीमध्ये पोहोचले. त्यावेळी बिबट्या कुत्र्यांच्या कंट्रोल रुममध्ये जाळ्यात अडकलेला दिसल्याने त्यांचा संशय आणखीनच बळावला.
वन्यजीवरक्षक संस्थेमार्फत बिबट्या बद्दल कसून चौकशी करण्यात आली. तिथल्या परिसरात राहणारे, काम करणारे यांच्याकडे याबद्दल विचारणा झाली. पण त्यांना या सर्वातून आश्चर्यकारक उत्तर मिळाली. अॅम्बे व्हॅलीमध्ये बिबट्या मृत झाला नसून तो अॅम्बे व्हॅलीच्या बाहेरचं मृत पावल्याचं तिथले कर्मचारी आणी वनखात्यातर्फे सांगण्यात येतंय.
पण बिबट्या व्हॅलीच्या बाहेर मेला तर तुम्ही तो व्हॅलीमध्ये असणार्या कुत्र्यांच्या कंट्रोल रुम मध्ये का आणला ? तो शवविच्छदनासाठी वडगाव येथे का नेला नाही ? असं वन्यजिवरक्षक संस्थेने विचारल्यावर त्यांनी पुन्हा बोलणं टाळल. यामुळे बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचं दिसतंय.