बिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद

Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 24, 2023, 10:39 AM IST
बिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद title=

Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्या (Leopard) मुक्तपणे संचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याला तात्काळ जेरबंद केलं जावं अशी मागणी नागरिक करत आहेत. नुकतंच एका बिबट्याने नागरिकावर हल्ला केला असून, त्याची कवटीच बाहेर काढली. विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. ही घटना सीसीसीटीव्ही कैद झाली असून, बिबट्या मागून धाव घेत राजू शेख यांच्यावर अंगावर झेप घेताना दिसत आहे. या घटनेनंतर नागरिक घाबरले आहेत. 

रविवारी रात्री नाशिकरोड परिसरात आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरड केल्याने येथे गर्दी जमली होती. बिबट्याच्या हल्ल्यात शेख यांची कवटीच बाहेर आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी शेख यांना तात्काळ सुजाता बिर्ला रुग्णालयात दाखल केले. 

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. गेल्या आठवड्यापासून गुलमोहर बंगला जय भवानी रोडवर सीसीटीव्हीच्या कॅमेरात बिबट्याचा मुक्त संचार दिसत असल्याने नागरिक घाबरले आहेत. 

राजू शेख एका गॅस एजन्सीमध्ये काम करतो. बिबट्याच्या हल्ल्यात राजू गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

व्हिडीओत काय दिसत आहे?

व्हिडीओत रस्त्यावर नेहमीप्रमाणे लोकांची आणि गाड्यांची वर्दळ दिसत आहे. यावेळी राजू शेख वळणवार चालत असताना बिबट्या झुडपातून पळत येतो. राजू शेख यांना काहीच कल्पना नसताना बिबट्या त्यांच्या अंगावर झेप घेतो आणि खाली पाडतो. यावेळी तेथून जाणारा एक बाईकस्वार हा हल्ला पाहतो. दरम्यान, तिथे लोकांची आरडाओरड झाल्याने बिबट्या पळ काढतो. यानंतर समोरुन जाणारी एक चारचाकी राजू शेख यांच्याजवळ येऊन थांबते. यानंतर लोक राजू शेख यांना रुग्णालयात दाखल करतात.  

नाशिक रोडला बिबट्याचा वावर

आनंदनगर भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याने पादचाऱ्यावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता. तसंच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना देखील सूचना दिल्या. 

गेल्या आठवड्यात नाशिकरोड परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आढळून आला. या बिबट्याला वनविभागाने तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.