विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर : गेल्या काही दिवसांपासून पावसाळी पर्टनासाठी पर्यटकांनी राज्यातली विविध ठिकाणी सुट्टीच्या दिवशी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र काही पर्यटक पावसाळी पर्टनचा आनंद घेताना अतिउत्साहीपणे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेकांचा जीव देखील जातो. तर अनेकदा गंभीर अपघात घडतात. असाच एक अपघात छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati sambhaji nagar) घडलाय. छत्रपती संभाजीनगरमधील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या अजिंठा लेणीमध्ये (ajanta caves) फिरायलाल गेलेला एक तरुण दोन हजार फूट खोल कुंडात पडला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीच्या समोरील व्ह्यू पॉईंट धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी (selfie) काढण्याच्या नादात एक पर्यटक थेट पाय घसरून दोन हजार फूट खोल कुंडात पडला होता. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन कुंडात पडलेल्या तरुणाला बाहेर काढले आहे. पोलीस (Chhatrapati Sambhaji Nagar Police) आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली. सेल्फीचा नादात रिस्क घेऊ नका, काळजीपूर्वक पर्यटनाचा आनंद घ्या असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरुणाच्या बचावकार्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
सेल्फी घेण्याच्या नादात हा 30 वर्षीय तरुण थेट लेणीच्या कुंडात पडला होता. मात्र, पोलिसांनी बचावकार्य करून या तरुणाला वाचवलं आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण (वय 30 वर्ष रा. नांदातांडा ता. सोयगाव) असं या तरुणाचं नाव आहे. रविवार असल्याने बऱ्याच प्रमाणात लोकांनी अजिंठा लेणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्याचवेळी जळगाव जिल्ह्यातील गोपाल पुंडलिक चव्हाण हा तरुण त्याच्या चार मित्रांसह तिथे लेणी पाहण्यासाठी आला होता. दरम्यान, गोपाल याने कुंडाजवळ सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तोल गेला आणि तो थेट दोन हजार फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला.
गोपाल चव्हाण कुंडात पडल्याने आजूबाजूला एकच खळबळ उडाली. लोकांनी आरडाओरडा करुन मदत मागवण्यास सुरुवात केली. मात्र गोपालला पोहता येत असल्याने कसातरी तो पोहत कुंडाच्या कपारीजवळ आला. तितक्यात पोलीस आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी तिथे आले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. दोरी आणि हार्नेसच्या सहाय्याने गोपालला कर्मचाऱ्यांनी कुंडाबाहेर काढले. गोपाल कुंडाबाहेर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.