शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूर शहरातील एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. पुढे एका खाजगी रुग्णालयात १० दिवस उपचार करुन ती तरुणी ठणठणीत बरीही झाली. मात्र कोरोना होणाऱ्या रुग्णांची तारांबळ होऊ नये यासाठी त्या तरुणीने ७० बेडचं जिल्ह्यातील पहिलं सर्व सोयींनियुक्त खाजगी कोविड केअर सेंटरचीच उभारणी केली.
लातूर शहरात राहणाऱ्या प्रेरणा होनराव, संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक-शैक्षणिक कार्य करतात. सततच्या जनसंपर्कामुळे गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना ऍडमिट होण्यासाठी लातूरच्या खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हता. त्यावेळी मोठी धावपळ आणि तारांबळ झाली होती. अखेर एका रुग्णालयात त्यांनी त्यांनी १० दिवस उपचार घेऊन कोरोनवार मातही केली.
मात्र लातूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची यादरम्यान होणारी परिस्थिती पाहाता, त्यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व सोयीनियुक्त असलेलं ७० बेडचं जिल्हातील पहिल्या खाजगी 'स्वास्थ्य कोविड सेंटर'ची उभारणी केली.
आपल्या मुलीला कोरोना झाल्यानंतर तिने अशा प्रकारचा प्रस्ताव संस्थेकडे ठेवल्यानंतर संस्थेनेही सर्वानुमते मान्यता दिल्याचे प्रेरणा यांचे वडील उमाकांत होनराव यांनी सांगितलं.
लातूरच्या नवीन रेणापूर नाका इथे स्वास्थ्य कोविड सेंटर उभारण्यात आलं असून सौम्य लक्षणे असलेले रुग्ण याठिकाणी अत्यल्प दरात उपचार घेऊ शकणार आहेत. १४ कर्मचारी, १२ नर्सेस आणि ४ आरएमओ डॉक्टर या कोविड सेंटरमध्ये असणार असून शासन नियमानुसार हे चालणार आहे. चहा-नाश्ता, दोन वेळचं जेवण, आयुर्वेदिक काढे, योगा, मानसोपचार तज्ज्ञांचे सल्ले या काळात रुग्णांना मिळणार आहेत. ना नफा ना तोटा तत्वावर सुरु केलेलं हे कोविड सेंटर सामाजिक जाणिवेतून उभारल्याचेही प्रेरणा सांगतात.
रुग्ण सेवेचा कसलाही गंध नसलेल्या संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टने शासकीय नियमानुसार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सामाजिक भावनेतून हे कोविड सेंटर सुरु केलं आहे. अशाच पद्धतीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने इतरही संस्था पुढे आल्यास शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन कोरोना रुग्णांची सोय होऊ शकते.