आईला दररोज होणारी मारहाण बघवत नव्हती, मुलाने जन्मदात्या वडिलांबरोबर जे केलं ते अंगाचा थरकाप उडवणारं..

Latur Crime : पित्याच्या हत्येनंतर मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर पत्नीने जखमी पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच पतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 6, 2023, 04:44 PM IST
आईला दररोज होणारी मारहाण बघवत नव्हती, मुलाने जन्मदात्या वडिलांबरोबर जे केलं ते अंगाचा थरकाप उडवणारं.. title=

वैभव बाळकुंदे, झी मीडिया, लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. लातूर (Latur Crime) शहरातील रेणुकानगर भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईला मारहाण करत असल्याचा राग मनात ठेवून मुलाने जन्मदात्या पित्याचा खून (son killed father) केल्याचे समोर आले आहे.‌ वडिलांच्या पोटात चाकू खूपसून मुलाने हा निर्घृण खून केला आहे. आईच्या तक्रारीवरुनच पोलिसांनी (Latur Police) मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

सोमनाथ क्षीरसागर असे मृत वडिलांचे नाव आहे. सोमनाथ क्षीरसागर हे पत्नीला मारहाण करत होते. आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने मुलगा रोहित क्षीरसागर याने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात रोहितने घरातील चाकू काढून वडिलांच्या पोटात आणि छातीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सोमनाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमनाथ यांची पत्नी मंगल क्षीरसागर यांनी मुलाच्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली. मंगल क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात रोहित क्षीरसागर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

लातुरातील आंबेजोगाई रोडवरील आंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुकानगरमध्ये क्षीरसागर कुटुंबिय राहत होते. दरम्यान तक्रारदार मंगल क्षीरसागर यांना पती सोमनाथ मधुकर क्षीरसागर मारहाण करत होते. त्यावेळी तेवीस वर्षीय मुलगा रोहित हा घरातच होता. आईला होत असलेली मारहाण पाहून त्याला राग आला. रोहितला डोळ्यासमोर होणारी मारहाण सहन झाली नाही. रागाच्या भरात घरात असलेला चाकू रोहितने हाती घेतला आणि जन्मदात्या वडिलांवर वार केले. चाकूने भोसकून रोहितने वडिलांचा खून केला.
 
या घटनेनंतर रोहित घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळलेल्या पतीला पत्नी मंगल यांनी तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमी झालेल्या सोमनाथ यांना मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलिस उपनिरीक्षक अतुल डाके, पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगल सोमनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.