फाशी नको, जन्मठेप द्या - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 21, 2017, 08:21 PM IST
फाशी नको, जन्मठेप द्या - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे  title=

अहमदनगर : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. 

तिन्ही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालं आज युक्तीवाद झाल्यानंतर उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.  आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली.

काय आहे मागणी? 

या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील मोहन मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली. तसेच अद्याप त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. 

दुसरीकडे  या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो २६ वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. 

शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ १०२ ब कटकारस्थान आणि १०९  गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षीत मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला. त्यामुळे त्याला कमी शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.