जयेश जगड, झी मीडिया, अकोला : लहान वयातच बचतीचा संस्कार व्हावा, म्हणून ही बँक कार्यरत आहे. अकोल्यातल्या या बँकेत छोट्या मंडळींनी आतापर्यंत लाखो रुपये जमवलेत. पॉकेटमनीच्या पैशातून सुरू झालेल्या या खात्यांमधून विद्यार्थी आता चक्क त्यांच्या शाळेची फी भरतायत.
या शाळेत लागलेली ही विद्यार्थ्यांची रांग आहे बँकेत पैसे जमा करण्यासाठी.... ही सगळी लगबग पातूरमधल्या किडस पॅराडाईज शाळेतली.... किड्स पॅराडाईज शाळेत गेल्या दोन वर्षांपासून ही चिल्ड्रेन मनी बँकेची स्थापना करण्यात आलीय. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑमवेट यांच्या हस्ते या उपक्रमाची मूहूर्तमेढ रोवली गेली.
दोन वर्षांआधी या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा पॉकेटमनी जंकफूडवर खर्च होत होता. आता मात्र पॉकेट मनीचे पैसे थेट या बँकेतच जमा होतायत. प्रत्येक सभासदाच्या खात्यात शंभरपासून हजारांवर रूपये डिपोझिट केले जातात... मग त्यातूनच हे विद्यार्थी पुस्तकं-वह्या, पेन-पेन्सिलपासून थेट शाळेच्या फीसुद्धा भरतात.
या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकही होते. प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थीनी प्रतिनिधींसाठी ही निवडणूक होते. त्यासाठी प्रचार, भाषण, मतदानासाठी रांगा अन विजयानंतरचा जल्लोष अन गुलालही उधळला जातो.... निवडले गेलेले संचालकही बँकेच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचं आश्वासन देतात.
या बँकेमुळे लहान वयातच मुलांमध्ये बचतीचा संस्कार होत असल्यानं पालकांनाही समाधान आहे.
सध्या दीडशेवर विद्यार्थी या बँकेचे सभासद आहेत. या तीन वर्षांतच या विद्यार्थ्यांची बचत ३ लाखांच्या जवळपास गेलीय. विद्यार्थ्याने पैसे भरल्यानंतर लगेच पैसे जमा झाल्याचा एसएमएस पालकांच्या मोबाईलवर जातो. यासाठी शाळेनं एक सॉफ्टवेअरही तयार केलंय. तर प्रत्येक आठवड्यात आणि महिन्यात सर्वाधिक बचत करणार-या विद्यार्थ्यांचा सन्मानही केला जातो.
विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा त्यांना व्यवहारिक ज्ञान देणंही तितकंच गरजेचं आहे.... या किडस बँकेच्या माध्यमातून मुलांना आर्थिक गणितंही लवकर कळतायत... आणि बचतही होतेय.