मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job

Maharashtra News : महायुती सरकारने राज्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांमध्ये सरकारने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागपूरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 17, 2023, 08:34 AM IST
मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job title=

Job News : देशासह राज्यातही दिवसेंदिवस उच्चशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसतेय. देश पातळीवर बेरोजगारी मिटवण्याचा प्रयत्न केला जात असताना राज्याच्या धर्तीवरही हेच प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने यासाठी आता मेगा प्लॅन आखला आहे. खासगी कंपन्यांसाठी मुलाखतीनंतर लगेचच नोकरी देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नागपुरातून या योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे.

राज्यातील महायुती सरकार खासगी कंपन्यांमध्ये तरुण-तरुणींना नोकऱ्या देणार आहे. त्यासाठीचा पहिला राज्यस्तरीय मेळावा 9 आणि 10 डिसेंबरला नागपुरात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर या मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सरकारने गुरुवारी पाच कोटी रुपये दिले.  नागपुरातील पहिल्या मेळाव्यात 200 कंपन्यांचे मेगास्टॅाल असणार आहेत. नागपुरातील मेळाव्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

उमेदवारांना कोणत्या कंपनीत कोणत्या आणि किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक योग्यता काय याची माहिती दिली जाईल. उमेदवारांच्या बायोडेटांची छाननी करून काहींना मुलाखतीनंतर तिथेच नोकऱ्या दिल्या जातील. तर काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि मार्गदर्शन केले जाईल. नागपुरच्या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी या आठवड्यात सुरू होणार आहे. 

सरकारी विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी नऊ खासगी संस्थांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. मात्र, विरोधकांच्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर प्रत्येक शासकीय विभाग आपल्या पातळीवर अशी भरती करतील अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. शासन आपल्या दारी कार्यक्रमामार्फत सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता तरुण तरुणींना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन महायुती सरकारने जनमानसात आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.