राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; जयदत्त क्षीरसागर 'मातोश्रीवर'

क्षीरसागर यांच्या मातोश्री भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Apr 7, 2019, 09:34 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; जयदत्त क्षीरसागर 'मातोश्रीवर' title=

मुंबई: बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील उपस्थित होते. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, क्षीरसागर यांच्या भेटीमुळे बीडमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. क्षीरसागर यांनी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, त्यांचे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी नुकसानदायक ठरू शकते. 

क्षीरसागर यांच्या मातोश्री भेटीवेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलींद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पक्षाविरोधात जाऊन बीडमधील युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचा संकल्प केल्यानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे. 

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती.  या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असे म्हणत क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केले होते.