सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  

Updated: Apr 5, 2019, 10:21 PM IST
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती title=

नागपूर : बसपा सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिले आहे. त्या नागपुरात बोलत होत्या. मोदींनी अच्छे दिनचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. आताही ते पुन्हा वारेमाप आश्वासन देत सुटले आहेत, अशी टीका त्यांनी केली. विदर्भातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचे आयोजन नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानात करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. 

बहुजन समाज पक्ष सत्तेत आल्यास गरिबांना प्रती महिना ६ हजार देण्याऐवजी आम्ही रोजगार देऊ, असे मायावती यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी भाजपने दिलेले १५ लाखांचे आश्वासन आता विनोदाचा विषय बनला आहे. काँग्रेसने देखील अनेक वर्षे अशा प्रकारचे प्रलोभन जनतेला दिले आहे. मात्र ही सगळी आश्वासने आणि प्रलोभने 'हवा-हवाई' ठरली.

या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने पैशे देण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र यामुळे गरिबांना काही स्थायी मदत मिळणार नाही. कारण राज्यात आणि केंद्रात दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत राहते, असे मायावती यावेळी म्हणाल्यात. त्यामुळे आम्हाला केंद्रात सत्ता बनवण्याची संधी मिळाली तर आम्ही गरिबांना ६ हजार महिना देण्याऐवजी त्यांना सरकारी आणि गैरसरकारी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणार असे मायावती यांनी स्पष्ट केले.

गरिबीची ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक हाताला रोजगार दिल्यावरच दूर होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपच्या आश्वासनाला गरिबांनी बाळू पडू नये, असेही आवाहन मतदारांना मायावती यांनी यावेळी केले.