जनता कर्फ्यू : कोरोनामुळे दशक्रिया विधीही लांबल्या

जनता कर्फ्यू असल्याने दशक्रिया विधीही सुद्धा पुढे ढकलण्यात आले आहेत.

Updated: Mar 22, 2020, 02:29 PM IST
जनता कर्फ्यू : कोरोनामुळे दशक्रिया विधीही लांबल्या title=

नाशिक : संपूर्ण देशभरातून दशक्रिया विधीसाठी नाशिक शहरातील रामकुंडावर दररोज गर्दी होत असते. मात्र आज जनता कर्फ्यू असल्याने हे विधी सुद्धा आज पुढे ढकलण्यात आल्याचे चित्र नाशिकच्या गोदा तटावर पाहायला मिळतंय. तुरळक काही साफसफाई करणारे कामगार, महापालिका कर्मचारी आणि पोलिस यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांनी कडक कर्फ्यू पाळला आहे. 

नाशिक जिल्ह्यात अद्याप कोरोना व्हायरसने प्रवेश केलेला नाही. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यातील नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. नाशिक शहरात जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 

देशभरात रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरातून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळतोय. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यू लागू आहे. कोरोनाची चेंन तोडायची असल्यास जनता कर्फ्यू अतिशय आवश्यक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांना घरात राहण्याचं, बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

दरम्यान, आजच्या जनता कर्फ्यूनंतर, रविवारी मध्यरात्रीपासून लांब पल्ल्याच्या गाड्या, पॅसेंजर 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

सरकारकडून नागरिकांना वेळोवेळी घरी राहण्याचे, रेल्वेने प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाही रेल्वेतील गर्दी कमी होत नसल्याचं चित्र आहे. कोरोनामुळे मुंबईतून, आपापल्या गावी जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. घरापासून लांब असणाऱ्यांनी आपापल्या घरी जाण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर मोठी गर्दी केली आहे. अशा गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळेच रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे