जळगाव: कोणालाही संकटात सोडून कधीच एकटी जात नाही. तर झाशीच्या राणीसारखं संकटांचा वेळोवेळी दोन हात सामना करत प्राण वाचवते. केवळ कुटुंबच नाही तर समाजातही वेळप्रसंगी ती मदतीला धावून येते. अशाच एका महिलेचा बहिणाबाई पुरस्कारानं नुकताच सन्मान करण्यात आला. जिने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा आदर्श घालून दिला आहे.
विमलबाई भिल यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्यात आला आहे. 16 जुलै दरम्यान एका प्रशिक्षणा दरम्यान ट्रेनिंग सुरू असताना विमानाचा अपघात झाला होता. त्यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला मात्र ट्रेनिंग घेणारी तरुणी जखमी अवस्थेत होती. ही घटना जिथे घडली तिथे रस्ता नसल्यानं रुग्णवाहिका पोहोचणं कठीण होतं. घटनास्थळापासून रुग्णवाहिकेपर्यंत या तरुणीला पोहोचवणं गरजेचं होतं.
दुर्घटना घडली तिथे आदिवासी भागातील काही नागरिक पोहोचले. हा सगळा प्रकार पाहिल्य़ानंतर तिथे विमलबाई भिल यांनी अंशिका गुर्जर या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी मदत केली. या तरुणीला घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या अंगावरची साडी फेडून लगेच झोळी करण्यासाठी पुढे केली. या तरुणीला झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत आणि तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
विमलबाई भिल यांनी दाखवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य आणि माणूसकी लाख मोलाची होती. त्यांच्यामुळे या तरुणीचा जीव वाचला. हे विमान 50 फूट खोल दरीत कोसळलं होतं. तिथून या तरुणीला वाचवण्याचं दिव्य या विमलबाई भिल यांच्यासह काही लोकांनी केलं. ज्यामुळे अंशिका नावाच्या तरुणीचा जीव वाचला.
ही घटना जळगावच्या विमान चोपडा तालुक्यातील वर्डी इथे घडली आहे. तर हे कोसळलेलं विमान शिरपूर इथल्या एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान असल्याचं माहिती मिळाली आहे. दुर्गम भागात विमान कोसळल्यानं तिथंवर पोहोचणं कठीण होतं. तिथे या विमलबाई पोहोचल्या आणि त्यांनी 3 किमी पर्यंत जखमी अंशीकाला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली.
विमलबाई यांना त्यांच्या कामगिरीबद्दल बहिणाबाई पुरस्कार देण्यात आला आहे. स्मृतिचिन्हं, सन्मानपत्र, साडी आणि 11 हजार रुपये रोख रक्कम असं त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत दुर्घटनास्थळावर मदत करणाऱ्या 11 जणांचाही सन्मान करण्यात आला आहे.