भाजप सत्ता काळात महागाईत भरमसाठ वाढ आणि सत्तेचा गैरवापर - पवार

Sharad Pawar's strong criticism of BJP​ : देशात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजपचे राज्य आल्यानंतर भरमसाठ किमती वाढत आहेत. तसेच ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का, असा सावल शरद पवार यांनी विचारला आहे.

Updated: Apr 3, 2022, 09:45 AM IST
भाजप सत्ता काळात महागाईत भरमसाठ वाढ आणि सत्तेचा गैरवापर - पवार title=

कोल्हापूर : Sharad Pawar's strong criticism of BJP : देशात प्रचंड महागाई वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढत आहेत, हे कधी पाहिलं नव्हतं. भाजपचे राज्य आल्यानंतर भरमसाठ किमती वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्याची मोठी किंमत सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. मात्र या मुद्द्याकडे केंद्र सरकार बोलत नाही. एकेकाळी भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते. आता महागाईवर गप्प आहेत. तसेच ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का? आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी जातात. सत्तेचा हा गैरवापर आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर केली आहे.

सध्या सामाजिक ऐक्य धोक्यात येईल, अशी भूमिका या सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी वेगळं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. 'काश्मीर फाईल' हा चित्रपटावरून नागरिकांत संताप निर्माण करण्याचा  प्रयत्न केला जातो. ही घटना घडली त्यावेळी सरकार कुणाचं होतं, त्यांना कुणाचा पाठींबा होता हे देखील पाहा. भारतात राहायचं असं म्हणणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंवर देखील हल्ले केले होत आहेत, हे चिंताजनक आहे, असे पवार म्हणाले.

 काश्मीर मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, तिथल्या लोकांनी नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी साधनं पुरवली होती. हा इतिहास असताना ही फिल्म अशी बनवणं चुकीचे आहे. जनमानसांत विषारी भावना निर्माण करण्याची भूमिका यांची आहे. लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधीपक्ष सक्षम असायला हवा. नाहीतर पुतीन सारखं होऊन बसेल. सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलो नाही. तपास यंत्रणांचा वापर आम्ही कधी केला नाही. कोल्हापूरला कधी येऊन गेले तर मी पाहुणे येऊन गेले का असं विचारतो? ईडी हा शब्द कुणाला माहीत होती का? आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी जातात. आम्ही तुमच्याकडे येणार आहोत रस्त्यात काहीतरी उभा करा असं सांगितलं जातं असं ऐकायला मिळतंय. काहीतरी आर्थिक घडामोडी घडत आहेत, असं ऐकायला मिळत आहे. यावर केंद्र सरकारने नियंत्रण आणले पाहिजे, असे पवार म्हणाले.

युक्रेन आणि रशियात काय चाललं आहे त्यावर आपण बोलू नये. मात्र, आपण भाजपचे विरोधक पण आंतरराष्ट्रीय भूमिका घेण्याची वेळ येत अशा वेळी राजकारण करायचं नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडीची जबाबदारी घेण्याची माझी इच्छा नाही ती जबाबदारी मी घेणार नाही. पण विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी करणार आहे. ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे त्या पक्षांने पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले.

महागाई विरोधात विधिमंडळात आवाज उठवला जात आहे. आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला कशाला हवी. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाही बद्दल जास्त प्रेम असत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते. कुणाच्यातरी सांगण्यावरून कारवाई केली जाते हे लोकांना समजते. याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल, असे पवार म्हणाले.